शुक्रवार, ६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

धारावीतील एन. शिवराज मैदानाची स्वच्छता सुरू

धारावीतील एन. शिवराज मैदानाची दुरवस्था झाल्यानंतर महापालिकेने स्वच्छतेला सुरुवात केली आहे. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत मैदानातील मातीचा ढिगारा हटवला जात आहे.

धारावीतील एन. शिवराज मैदानाची स्वच्छता सुरू

संत कक्कय्या मार्गावरील नवीन म्युनिसिपल चाळीसमोरील धारावीतील एन. शिवराज मैदानाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. याप्रश्नी धारावी नागरिक समिती व अन्य संघटनांनी महापालिकेवर धडकण्याचा इशारा दिला होता. या समस्येबाबत गुरुवार (ता. ५)च्या अंकात ‘एन. शिवराज मैदानाची दुरवस्था’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची पालिकेने दखल घेत मैदानाच्या स्वच्छतेला सुरुवात केली आहे. यामुळे स्थानिक रहिवासी व सामाजिक संघटनांनी समाधान व्यक्त केले आहे.

## मातीच्या ढिगाऱ्यामुळे मुलांना धोका

गणेश विसर्जनासाठी मैदानात कृत्रिम तलाव उभारण्यात आला होता. स्थानिकांचा विरोध असतानाही तलाव बनविण्यात आला. विसर्जनानंतर तलाव हटविण्यात आला; मात्र खोदकामातील माती व्यवस्थित पसरवली नसल्याने मैदानात मातीचा मोठा ढिगारा तयार झाला होता. त्यामुळे मुलांना खेळण्यासाठी मैदान उपलब्ध नव्हते. ढिगाऱ्यावर खेळणाऱ्या लहान मुलांच्या अपघाताचा धोका निर्माण झाला होता. याशिवाय खेळाचे साहित्य तुटलेले, सुरक्षा रक्षकांचा अभाव, १० हजार लिटरची रिकामी पाण्याची टाकी, वृक्षांना पाण्याची अनुपलब्धता आणि अस्वच्छता अशा अनेक समस्या होत्या.

## नागरिक समितीचे निवेदन

या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी धारावी नागरिक समितीचे संघटक सचिव दिलीप गाडेकर यांच्यासह अलका साबळे, गिरीराज शेरखाने, गोविंद भोईटे, जयराम सदाफुले, सरिता शेरखाने आणि दत्ता खंदारे यांनी महापौर, विरोधी पक्षनेते, महापालिका आयुक्त, स्थानिक आमदार, नगरसेवक तसेच संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. दिवाळीच्या तोंडावर मागण्यांची पूर्तता न झाल्यास महापालिकेवर धडक देण्याचा इशाराही समितीने दिला होता.

स्रोत: मूळ बातमी

अभी जाधव

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance