खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकात वेचणी नवरात्रोत्सवात गतीने सुरू झाली. पण सध्या सणासुदीसह कमी कापूस आवकेने जिनींग प्रेसिंग कारखान्यांत कापूस प्रक्रिया रखडत सुरू आहे. खानदेशात अद्याप ८० टक्के जिनींग प्रेसिंग कारखाने बंद आहेत. जळगाव जिल्ह्यात धरणगाव, पारोळा भागात आघाडीचे कारखाने सुरू आहेत. पण तेथेही प्रक्रिया १०० टक्के क्षमतेने सुरू नाही. पाऊसमान कमी राहिल्याने कोरडवाहू कापूस पिकाची स्थिती बिकट आहे आणि कापूस उत्पादन कमी झाल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत.
कापूस बाजार मागील काही दिवसांत अस्थिर झाल्यानेही काही कारखानदारांनी सावध पवित्रा घेतला आहे. कापसाची खेडा किंवा थेट खरेदी खानदेशात केली जाते. ही खेडा खरेदी दिवाळी, कोजागिरी पौर्णिमेच्या काळात गती घेते. पण यंदा दसरा सणातही कापूस आवक कमी होती. आता दिवाळी सणही कमी कापूस आवकेचा राहील, असे दिसत आहे.
## दर्जेदार कापूस उपलब्ध
बागायती किंवा पूर्वहंगामी क्षेत्रातील कापूस वेचणीवर येताच पाऊस नव्हता. कोरडे वातावरण सप्टेंबरपासून आहे. यामुळे कापसाची वेचणी काहीशी लवकर सुरू झाली आणि ही वेचणी गतीने सुरू आहे. पण लागवड कमी असल्याने कापूस आवकही कमी आहे. दुसरीकडे कापसाची खेडा खरेदीही हवी तशी सुरू झालेली नाही. दर्जेदार कापूस यंदा आहे, कारण परतीच्या पावसाचा फारसा तडाखा पूर्वहंगामी पिकास बसला नाही.
## दिवाळीनंतर प्रक्रियेस गती शक्य
सुमारे १२० ते १३० कारखाने दरवर्षी खानदेशात कापसावर प्रक्रिया करतात. एका कारखान्यास रोज किमान ८० ते ९० क्विंटल कापसाची गरज असते. परंतु कापसाची आवक कमी आहे आणि त्यात आता सणासुदीमुळे प्रक्रिया रखडत सुरू आहे. कापूस प्रक्रिया दिवाळीनंतर किंवा पुढील महिन्यात गती घेईल. खानदेशात सुमारे १५० जिनींग प्रेसिंग कारखाने आहेत. त्यात कापसापासून सरकी व रुई तयार केली जाते. हे कारखाने सर्वत्र खासगी व्यवस्थापनाचे आहेत, त्यामुळे यात कार्यप्रणालीचे सर्व निर्णय कारखानदार, मालक घेतात.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply