ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण चिंताजनक असल्याचे टाटा स्मारक केंद्राच्या संशोधनातून समोर आले आहे. ग्रामीण भागातील तीनपैकी एका प्रौढाला उच्च रक्तदाबाचा त्रास असून, त्यापैकी बहुतांश नागरिकांना आपल्या आजाराची जाणीवच नसल्याचे आढळले आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी केवळ ३९ टक्के जणांचाच रक्तदाब नियंत्रणात असल्याचेही या अभ्यासात स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रातील बार्शी येथे सुमारे ४० हजार नागरिकांवर करण्यात आलेल्या या संशोधनातून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील उच्च रक्तदाबाच्या निदान आणि उपचारांमधील त्रुटी अधोरेखित झाल्या आहेत. या संशोधनाचे निष्कर्ष एनपीजे कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत.
२०१५ ते २०२० या काळातील अभ्यास
टाटा स्मारक केंद्राच्या कर्करोग महामारीशास्त्र केंद्र आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी इंडियन स्टडी ऑफ हेल्दी एजिंग या अभ्यासांतर्गत २०१५ ते २०२० या कालावधीत बार्शीतील ३० ते ६९ वयोगटातील नागरिकांच्या आरोग्यविषयक माहितीचे विश्लेषण केले. सहभागी नागरिकांचा रक्तदाब मोजण्यासोबतच यापूर्वी उच्च रक्तदाबाचे निदान झाले होते का आणि त्यासाठी औषधे घेतली जात आहेत का, याचीही माहिती घेण्यात आली.
औषधे घेऊनही रक्तदाब नियंत्रणाबाहेर
उच्च रक्तदाबाचे निदान झालेल्या नागरिकांपैकी सुमारे ७३ टक्के जण रक्तदाब कमी करण्यासाठी औषधे घेत होते. मात्र औषधोपचार सुरू असूनही त्यापैकी केवळ ३९ टक्के नागरिकांचाच रक्तदाब नियंत्रणात होता. त्यामुळे औषधे सुरू असतानाही अनेक रुग्णांना हृदयविकार आणि पक्षाघाताचा धोका कायम असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. नियमित तपासणी, औषधोपचारांमधील सातत्य आणि वैद्यकीय देखरेखीचा अभाव ही यामागील महत्त्वाची आव्हाने असल्याचे संशोधकांनी नमूद केले.
अभ्यासात सहभागी नागरिकांपैकी ३१ टक्के जणांना उच्च रक्तदाब असल्याचे आढळले. त्यापैकी केवळ सहा टक्के नागरिकांना यापूर्वीच या आजाराचे निदान झाले होते, तर तब्बल २५ टक्के नागरिकांना आपल्याला उच्च रक्तदाब असल्याची कल्पनाही नव्हती. उच्च रक्तदाब असलेल्या पुरुषांपैकी केवळ १४ टक्के आणि महिलांपैकी २१ टक्के महिलांना आपल्या आजाराची पूर्वकल्पना होती. वय वाढत जाईल तसे उच्च रक्तदाबाचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून आले. यापूर्वीच हृदयविकाराचे निदान झालेल्या नागरिकांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत होते.
टाटा स्मारक केंद्राच्या प्रगत कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षण केंद्राचे संचालक तसेच संशोधनाचे वरिष्ठ लेखक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी ग्रामीण भागात उच्च रक्तदाबाची नियमित तपासणी होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. वेळेत निदान झाल्यास हृदयविकार, पक्षाघात आणि मूत्रपिंडाच्या दीर्घकालीन आजारांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply