सणासुदीच्या काळात फटाक्यांची आतषबाजी करताना डोळ्यांच्या सुरक्षेकडे अनेकदा दुर्लक्ष होते. मात्र फटाक्यांमुळे डोळ्यांना गंभीर आणि काही वेळा कायमस्वरूपी इजा होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी फटाके उडवताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर येथील नेत्ररोगतज्ज्ञांच्या संघटनेने केले आहे.
फटाक्यांमुळे होणाऱ्या अपघातांत लहान मुले आणि प्रौढ दोघांनाही डोळ्यांना गंभीर दुखापत होण्याचा धोका असतो. काही घटनांमध्ये दृष्टी कायमची बाधित होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे उत्सवाचा आनंद घेताना डोळ्यांचे रक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
फटाके उडवताना घ्यावयाची काळजी
फटाके उडवताना सुरक्षित चष्मा वापरावा, असे तज्ज्ञांनी सुचवले आहे. फुलबाजी, अनार किंवा भुईचक्र यांसारख्या फटाक्यांपासून किमान चार मीटर अंतर ठेवावे, तर आवाज करणाऱ्या फटाक्यांपासून किमान दहा मीटर अंतर ठेवणे आवश्यक आहे. लहान मुलांनी फटाके एकट्याने उडवू नयेत; मोठ्यांच्या उपस्थितीतच सुरक्षित ठिकाणी फटाके उडवावेत.
जळलेल्या काड्या विझवण्यासाठी आणि फटाके आटोक्यात आणण्यासाठी जवळ पाणी ठेवावे. फटाका पेटवताना तो डोळ्यांजवळ किंवा चेहऱ्याजवळ नेऊ नये. पेटला नाही असा फटाका पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नये. अनार, भुईचक्र किंवा बॉम्ब हातात धरून पेटवू नयेत, तसेच काचेच्या बाटल्यांमध्ये फटाके फोडू नयेत, कारण स्फोटामुळे काचेचे तुकडे डोळ्यांना गंभीर इजा करू शकतात.
संघटनेच्या अध्यक्षा डॉ. शुभा झंवर, सचिव डॉ. जगदीश लोया, कोषाध्यक्ष डॉ. अभिजित गोरे आणि वैज्ञानिक समितीचे अध्यक्ष डॉ. अर्चना वरे यांनी नागरिकांना सुरक्षित दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत १०८ किंवा ११२ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले आहे.
दुखापत झाल्यास काय करावे
फटाक्यांमुळे डोळ्याला दुखापत झाल्यास डोळे चोळू नयेत किंवा त्यावर दाब देऊ नये. डोळ्यात कण गेल्यास पाणी मारून स्वतः उपचार करण्याचा प्रयत्न टाळावा. डोळा स्वच्छ कापडाने किंवा पेपर कपने हलकेच झाकावा आणि डोळ्यावर कोणताही दाब न देता तातडीने नेत्ररुग्णालयात जाऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply