महामार्गालगत साचलेला कचरा, रस्त्यांवर पडलेले भंगार आणि खुल्या भूखंडावर उभी केलेली जुनी वाहने यामुळे शहराच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियाना’अंतर्गत महापौर दीपमाला काळे यांनी सोमवारी (२ नोव्हेंबर) प्रभाग क्रमांक १६ मधील जुने जळगाव, ट्रान्सपोर्टनगर आणि लक्ष्मीनारायण नगर परिसराची पाहणी केली. अस्वच्छता आणि अतिक्रमणांचे प्रकार पाहून त्यांनी दुकानदारांसह संबंधित अधिकाऱ्यांना खडसावले.
अतिक्रमण हटविण्याचे आणि दंडाचे निर्देश
अतिक्रमणे हटविणे, कचरा उचलणे आणि नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश महापौरांनी दिले. जुने जळगावातील विठ्ठल मंदिर परिसरात नळांच्या तोट्या तपासण्यासह अमृत योजनेची प्रलंबित नळजोडणी तातडीने पूर्ण करण्यास सांगण्यात आले. रस्त्यावर पडलेले बांधकाम साहित्य हटविण्याचेही आदेश देण्यात आले. कोल्हे विद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्यात थर्माकोलचे बॉक्स आणि शेवाळ मोठ्या प्रमाणात साचले होते. हा कचरा एमआयडीसी परिसरातून येत असल्याचे समजल्यानंतर पोकलँडच्या साहाय्याने नाल्याची तातडीने सफाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ट्रान्सपोर्टनगरातील स्थिती
ट्रान्सपोर्टनगरात महामार्गालगत कुशनचा कचरा, वाहनांच्या फुटलेल्या काचा आणि भंगार पडलेले आढळले. त्यामुळे संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. बाजारपेठेतील खुल्या जागेत डंपर आणि जुनी वाहने उभी करून जागा अडविल्याने दुकानदारांना ती वाहने तत्काळ हटविण्याचा इशारा देण्यात आला. जागा रिकामी न केल्यास महापालिकेमार्फत कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. साई पार्कजवळील नाल्यालगत संरक्षण भींत उभारणे आणि रेड स्वस्तिकच्या रिकाम्या जागेत महापालिकेची कार्यालये उभारण्याची शक्यता तपासण्यास सांगण्यात आले. लक्ष्मीनारायण नगरातील नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर दंड, नाल्यांची सफाई आणि बंद पथदिवे तातडीने सुरू करण्याचे निर्देशही देण्यात आले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply