परतीच्या पावसाची वाट पाहण्यात ऑक्टोबर महिना गेला. परतीचा पाऊस न आल्याने रब्बीच्या पेरण्यांवर परिणाम झाला आहे. ज्यांनी पेरणी केली आहे, ते पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत, तर ज्यांनी पावसाच्या प्रतीक्षेत पेरण्या थांबविल्या आहेत, त्यांच्यासाठीही पाऊस आवश्यक आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशी कमाल तापमानात जवळपास तीन अंश सेल्सिअसने घट झाली असून तापमानातील घट, ढगाळ वातावरण आणि वाढलेली आर्द्रता यामुळे पावसाची अपेक्षा अजूनही कायम आहे.
तापमानाचा आलेख
ऑक्टोबर महिन्यात तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोचला होता. ऑक्टोबरच्या शेवटच्या दिवशी शनिवारी, ३१ ऑक्टोबर रोजी सोलापुरात ३६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्या तुलनेत नोव्हेंबरच्या पहिल्या दिवशी सोलापूरचे तापमान ३३.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. किमान तापमानाचा पाराही २४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू लागल्याने वातावरणातून थंडी पूर्णपणे गायब झाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आर्द्रता वाढल्याने वातावरणात कमालीचा उकाडा आणि दमटपणा वाढला आहे. यंदा पावसाने मोठा खंड दिल्याने पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आतापासूनच उद्भवू लागला आहे.
नोव्हेंबरचा पाऊस आणि सोलापूरच्या नोंदी
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात पाऊस हजेरी लावत असल्याच्या आतापर्यंतच्या नोंदी आढळतात. या महिन्यात १० ते १०० मिलिमीटरपर्यंत सरासरी पाऊस यापूर्वी झालेला आहे. आता काही शेतकऱ्यांनी हवेतील गारव्यावर, पडणाऱ्या धुक्यावर आणि पावसाच्या आशेवर रब्बी पिकांची पेरणी केली आहे. पेरणी झालेल्या पिकांसाठी नोव्हेंबरमधील पावसाची आवश्यकता आहे. या महिन्यात पाऊस झाल्यास पेरलेल्या ज्वारीतून किमान जनावरांसाठी चारा तरी उपलब्ध होणार आहे. सोलापूरच्या नोव्हेंबरमधील नोंदींनुसार सर्वाधिक कमाल तापमान ३६.१ अंश सेल्सिअस (७ नोव्हेंबर १८९६), सर्वाधिक किमान तापमान ४.६ अंश सेल्सिअस (२७ नोव्हेंबर १९६४), २४ तासांतील सर्वाधिक पाऊस १०८.८ मिलिमीटर (१० नोव्हेंबर १९८५) आणि नोव्हेंबर महिन्यातील सर्वाधिक पाऊस २३५ मिलिमीटर (२०१९) अशी आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply