रात्रीच्या वेळी भरधाव जाणाऱ्या संशयित चारचाकीचा पाठलाग करून वणी पोलिसांनी चार गोवंशांची निर्दयतेने होणाऱ्या वाहतुकीतून सुटका केली आहे. ही कारवाई ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वणी ते पिंपळगाव रस्त्यावरील खेडगाव शिवारात हॉटेल जगदंबासमोर करण्यात आली. कारवाईदरम्यान अंधाराचा फायदा घेऊन गाडीचा चालक घटनास्थळावरून पसार झाला.
पाठलागानंतर गाडी अडविली
पोलीस शिपाई मच्छिंद्र पिठे आणि त्यांचे सहकारी ३१ ऑक्टोबरच्या रात्री वणी गावात गस्त घालत होते. रात्री १२:१० वाजेच्या सुमारास सापुतारा बाजूकडून वणी बाजूकडे येणारी एक चारचाकी (एमएच १५ सीटी ३५७२) भरधाव जाताना दिसली. संशय आल्याने पोलिसांनी गाडी थांबण्याचा इशारा केला, मात्र चालकाने वेग वाढवून पिंपळगावच्या दिशेने पळ काढला. पोलीस पथकाने सरकारी वाहनाने तत्काळ पाठलाग करत खेडगाव शिवारात हॉटेल जगदंबासमोर इको गाडीला ओव्हरटेक करून रोखले. गाडी थांबताच चालक अंधाराचा फायदा घेत गाडी सोडून पळून गेला.
जनावरे वाईट स्थितीत आढळली
गाडीची पाहणी केली असता, त्यात चार गोवंश जातीची जनावरे तोंड आणि पाय क्रूरतेने बांधलेल्या अत्यंत वाईट स्थितीत आढळली. एक लाख २० हजार रुपये किमतीची कार आणि सुमारे ६० हजार रुपये किमतीची चार गोवंश जनावरे, असा एकूण एक लाख ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. सुटका करण्यात आलेल्या जनावरांना चारा-पाण्याची सोय करण्यासाठी वणी येथील गोशाळेत दाखल करण्यात आले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply