पर्यटन म्हणजे केवळ निसर्गरम्य स्थळे पाहणे नव्हे, तर एखाद्या प्रदेशाची विचारधारा आणि संस्कृती समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. जळगावच्या पर्यटन नकाशावर सातपुडा, अजिंठा, पाटणादेवी आणि उनपदेव यांच्याइतकेच महत्त्वाचे नाव म्हणजे जैन हिल्सवरील गांधी तीर्थ. युवकांसाठी हे ठिकाण प्रेरणास्थान ठरावे, या उद्देशाने ज्येष्ठ विचारवंत भवरलाल जैन यांनी गांधी तीर्थाची निर्मिती केली. त्याचा लोकार्पण सोहळा २५ मार्च २०१२ रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाला.
तंत्रज्ञानातून गांधीजींचा जीवनप्रवास
येथे उभारलेले ‘खोज गांधीजी की’ हे मल्टिमीडिया संग्रहालय महात्मा गांधींचे जीवन आणि कार्य आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उलगडते. टचस्क्रीन, डिजिटल पुस्तके, थ्री-डी मॅपिंग, म्युरल्स आणि ॲनिमेशनसारख्या संवादात्मक माध्यमातून गांधीजींचा संपूर्ण जीवनप्रवास अवघ्या दोन ते अडीच तासांत मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये मांडला जातो. त्यामुळे हे ठिकाण केवळ संग्रहालय न राहता विद्यार्थी, संशोधक आणि सर्वसामान्य पर्यटकांसाठी अनुभवातून शिकण्याचे विद्यापीठ बनले आहे. संग्रहालयाबरोबरच येथील ग्रंथालय आणि अभिलेखागार हे संशोधनाचे महत्त्वाचे केंद्र आहे. गांधी विचार, इतिहास, समाज, अर्थव्यवस्था, पर्यावरण आणि ग्रामीण विकास या विषयांवरील अभ्यासाला येथे चालना मिळते, ज्याचा लाभ देशभरातील आणि विदेशातील अभ्यासकांनाही होतो.
पर्यटनातून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना
गांधी तीर्थाचा आर्थिक पैलूही महत्त्वाचा आहे. येथे येणारे पर्यटक स्थानिक वाहतूक, भोजन, निवास आणि मार्गदर्शक सेवांचा आधार घेतात. संग्रहालयातील केंद्रात पुस्तके, खादी वस्त्रे आणि हस्तकलेच्या वस्तू उपलब्ध असल्याने गांधी विचारांचा प्रसार होतानाच स्थानिक उत्पादनांनाही बाजारपेठ मिळते. शाळा-महाविद्यालयांच्या सहली, शैक्षणिक शिबिरे आणि ‘मोहन ते महात्मा’ यांसारख्या फिरत्या प्रदर्शनांमुळे, तसेच शाळांमधून घेतल्या जाणाऱ्या गांधी विचार परीक्षांमुळे देशभरातील विद्यार्थी आणि अभ्यासक जळगावकडे आकर्षित होत आहेत. यातून ‘विचार पर्यटन’ किंवा ‘ज्ञान पर्यटन’ ही नवी संकल्पना रुजत आहे. अजिंठा, पाटणादेवी, उनपदेव आणि पद्मालय यांसारख्या स्थळांशी गांधी तीर्थाला जोडल्यास एक व्यापक पर्यटन परिपथ उभा राहू शकतो. पर्यटकांचा मुक्काम वाढला, की त्याचा थेट फायदा हॉटेल्स, भोजनालये आणि छोट्या व्यावसायिकांना मिळतो. गांधीजींच्या विचारांत ग्रामविकास आणि स्वावलंबनाला केंद्रस्थान होते. त्याच भावनेने गांधी तीर्थाभोवतीचे पर्यटन स्थानिक अर्थव्यवस्थेशी जुळले, तर जळगावला केवळ पर्यटकच नव्हे, तर स्थानिक विकासाची नवी दिशाही मिळू शकते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply