संसदेत मतदारसंघ पुनर्रचनेचे विधेयक मांडण्याची तयारी सुरू असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या संसदीय पक्षाची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीसाठी पक्षाने आपल्या सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे वैशिष्ट्य म्हणजे, शिंदेसेनेत गेलेल्या सहा खासदारांनाही हा आदेश बजावण्यात आला आहे. त्यामुळे या सहा खासदारांच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
## सहा फुटीर खासदारांनाही व्हिप
ठाकरेसेनेने ज्या सहा खासदारांना व्हिप बजावला आहे, त्यामध्ये धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे संजय जाधव, ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील आणि वाशीमचे संजय देशमुख यांचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी या सहा खासदारांनी शिंदेसेनेत प्रवेश केला होता. मात्र, ठाकरेसेनेचे म्हणणे आहे की, हे खासदार अजूनही आपल्याच पक्षाचे आहेत. दुसरीकडे, शिंदेसेनेने लोकसभा अध्यक्षांनी या प्रवेशाला मान्यता दिल्याचे म्हटले आहे.
## व्हिप मोडल्यास काय होणार?
हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. लोकसभा अध्यक्षांनी या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात अद्याप उत्तर दिलेले नाही, असे ठाकरेसेनेने म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरेसेनेने संसदेच्या अधिवेशनासाठी सहा फुटीर खासदारांनाही व्हिप बजावला आहे. त्यामुळे पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास या खासदारांवर अपात्रतेची कारवाई होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मतदारसंघ पुनर्रचनेच्या विधेयकाच्या माध्यमातून ठाकरेसेनेने नवा राजकीय डाव टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा