डिलिमिटेशन विधेयकावरून काँग्रेसला आणखी झटका बसण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीतील घटक पक्ष आणि झारखंडमध्ये मोठ्या भावाची भूमिका निभावणारा झारखंड मुक्ती मोर्चा या विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. एकीकडे इंडिया आघाडी या विधेयकाच्या विरोधात आहे. जेएमएम पक्षाने अद्याप आपली भूमिका उघड केलेली नाही. परंतु त्यांचा पक्ष विधेयकाला पाठिंबा देण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जेएमएमची भूमिका काय?
हेमंत सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा पक्ष हा इंडिया आघाडीतील घटक पक्ष आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे ६ खासदार आहेत. त्यांचे तीन खासदार लोकसभेत आहेत, तर तीन राज्यसभेत आहेत. डिलिमिटेशन विधेयकावरून हेमंत सोरेन यांनी त्यांच्या निवासस्थानी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत या विधेयकात राज्याच्या हिताचे रक्षण आणि अनुसूचित जमातींच्या प्रतिनिधित्वावर चर्चा होणार आहे. जेएमएमच्या राज्यसभा खासदार महुआ यांनी विधेयकावर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, शुक्रवारी रात्री विधेयकाच्या प्रती मिळाल्या. मुख्यमंत्री सोरेन यांनी सर्व खासदारांना सांगितले की, त्यांनी या विधेयकाचा अभ्यास करावा. या विधेयकामध्ये झारखंडचे हित आहे का, हे तपासून घ्यावे. या विधेयकावरून तज्ज्ञ मंडळींचा देखील सल्ला घेतला जाणार आहे. अभ्यासानंतर एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
काँग्रेसची धावपळ वाढली
दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या अडचणी वाढू लागल्या आहेत. डिलिमिटेशनवरून इंडिया आघाडीत फूट पडल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना अपयश आले. आता राहुल गांधी आणि इतर नेते मुंबईत पोहोचले आहेत. सर्व नेते शरद पवार यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. इंडिया आघाडीचे सर्व नेते मुंबईत पोहोचले आहेत. विमानतळावर नेत्यांच्या स्वागतासाठी राज्यातील काँग्रेसचे नेते पोहोचले आहेत. मुंबईत पोहोचल्यानंतर सर्व नेते शरद पवार यांना भेटणार आहेत. या भेटीत नेमकी काय चर्चा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा