गोव्यात आयोजित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या पुरस्कार सोहळ्यातील एका घटनेवर इस्रायलचे पश्चिम आणि मध्य भारतातील कौन्सुल जनरल यानिव रेवाच यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुर्की चित्रपटाच्या निर्मात्यांनी भारताच्या आदरातिथ्याचा गैरवापर करत पुरस्कार सोहळ्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
रेवाच यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली. तुर्की चित्रपटाच्या निर्मात्यांचा हा प्रयत्न निराशाजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याच पोस्टमध्ये त्यांनी गाझामधील परिस्थितीचाही उल्लेख केला. इस्रायली आणि पॅलेस्टिनी नागरिकांचे भविष्य धोक्यात आणणाऱ्या हमासच्या दहशतवाद्यांपासून गाझाची मुक्तता झाली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
‘रहमा’ चित्रपटाला गांधी पदक
यंदाच्या इफ्फी महोत्सवात तुर्की दिग्दर्शक फैसल सोयसाल यांच्या ‘रहमा’ या चित्रपटाला प्रतिष्ठेच्या आयसीएफटी-युनेस्को गांधी पदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मंचावरून बोलताना सोयसाल यांनी आपला पुरस्कार गाझातील नागरिकांना समर्पित केला. शांतता आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याला राजकीय वळण दिल्यामुळे इस्रायलने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
युद्धग्रस्त सीरियातील संघर्ष आणि निर्वासित आयुष्याची पार्श्वभूमी या सिनेमात आहे. यामध्ये युद्धात अनाथ झालेल्या एका लहान मुलीची आणि तिला मायेचा आधार देणाऱ्या एका महिलेच्या मातृत्वाची भावनिक कथा दाखवण्यात आली आहे. या सिनेमाची निर्मिती तुर्की, बल्गेरिया, ग्रीस आणि इटली या चार देशांच्या सहकार्याने झाली आहे.
वादाला आंतरराष्ट्रीय वळण
इफ्फीतील संबंधित घटनेवर इस्रायली कौन्सुल जनरल यांनी केलेल्या या विधानामुळे महोत्सवातील घडामोडींना आंतरराष्ट्रीय संदर्भ प्राप्त झाला असून आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. या वादाचे आता काय पडसाद उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा