सलमान खानच्या आगामी युद्धपटातील एका गाण्याच्या बोलांवरून सुरू झालेला वाद आता अधिकच चर्चेत आला आहे. ‘मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस’ या चित्रपटातील ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ या गाण्यावरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या वादावर ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी आपली भूमिका मांडली असून, सलमान खाननेही सैनिकांच्या प्रतिमेबाबत थेट सवाल केले आहेत. हा चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी या चित्रपटाचे नाव गलवान असे ठेवण्यात आले होते. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांशी बिहारी बटालियनच्या सैनिकांचा झालेला संघर्ष यावर हा चित्रपट बेतलेला आहे. नंतर चित्रपटाचे नाव बदलण्यात आले.
## जावेद अख्तर काय म्हणाले?
चित्रपटांमधील गाणी ही समाजाचेच प्रतिबिंब असतात, असे जावेद अख्तर यांनी म्हटले आहे. आजच्या पिढीचा शब्दसंग्रह त्यांच्या आई-वडिलांच्या किंवा आजी-आजोबांच्या तुलनेत खूपच मर्यादित झाला आहे. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब गीतांमध्ये पडणारच, असे त्यांनी स्पष्ट केले. चित्रपटसृष्टी आणि चित्रपटांमधील संगीत या समाजापासून वेगळ्या गोष्टी नाहीत, असेही ते म्हणाले. आजची पिढी असो किंवा मोठ्या वयाची माणसे असोत, त्यांचा शब्दभांडार आधीच्या पिढीइतका समृद्ध राहिलेला नाही, असे त्यांचे मत आहे. भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती स्वतःमध्येच एक सुंदर कला आहे. भाषेचा वापर कसा केला जातो, यावर तिचे सौंदर्य आणि सभ्यता अवलंबून असते. आज आपल्या भाषांकडे किती लक्ष दिले जाते? आज किती लोक साहित्य आणि कविता वाचतात? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कला आणि साहित्याच्या तुलनेत नफ्याला अधिक महत्त्व दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. आज समाज पूर्णपणे व्यावहारिक झाला आहे. नफ्याची व्याख्या एवढीच उरली आहे की, यामुळे बँकेत पैसे जमा होतात का, पैसे काढता येतात का? जर तसे होत नसेल, तर त्याचा उपयोग काय? असा सवाल त्यांनी केला.
## सलमान खानचा सवाल
सलमान खानने या गाण्याचे समर्थन करताना सैनिकांना नेहमीच गंभीर आणि देशभक्तीच्या भूमिकेतच का दाखवले जाते, असा सवाल केला आहे. सैनिक बोअरिंग असतात का? त्यांना प्रेमभावना नसते का? मग त्यांना मुले कशी होतात? त्यांच्या आयुष्यात रोमान्स नसतो का? युद्धपटांमधील कथा केवळ युद्धाभोवतीच फिरायला हव्यात का? चित्रपटांमध्ये केवळ देशभक्तीचीच गाणी असायला हवीत का? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. सैनिकांचे काही स्वतःचे खासगी आयुष्य नसते का, असाही सवाल त्यांनी केला. ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ या गाण्यात अभिनेत्री चित्रांगदा सिंह पडद्यावर दिसत आहे. गाणे प्रदर्शित झाल्यानंतर त्याला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. विशेषतः युद्धपटात अशा प्रकारच्या गाण्याचे बोल असण्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र जावेद अख्तर यांनीही याबाबत आशावाद व्यक्त केला आहे. आजची तरुण पिढी पुन्हा साहित्य, संगीत आणि कलेच्या दिशेने वळत आहे. ते स्वतःहून या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ते अजिबात निराश नाहीत. येत्या १० ते १५ वर्षांत यामध्ये मोठा बदल पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा