मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा जवळपास निश्चित असल्याचे चित्र आहे. आधी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ती भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर वेगवेगळ्या नेत्यांनीही तसे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांचा निर्णय आपल्याला पटलेला नाही, असे खैरे म्हणाले. आम्ही त्यांच्या मागे मागे जात राहिलो आणि आमचे नुकसान झाले, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
शरद पवार यांच्या मागे महाविकास आघाडीत जाऊन आम्ही आमचे नुकसान करून घेतले, अशी टीका खैरे यांनी केली. ते भाजपकडे जातील, तुम्ही असेच राहणार, असे अनेक नेते म्हणत होते. त्यांच्याबरोबर राहून काय फायदा झाला? सत्तेतही राहिलो नाही. त्यांनी आम्हाला धोका दिला, असे खैरे म्हणाले. आताची परिस्थिती अशी आहे की त्यांनी आम्हाला धोका दिल्यासारखी आहे. सुप्रिया सुळे यांची भूमिका तळ्यात मळ्यात सुरू असल्याचे खैरे म्हणाले.
वसंतदादांपासून पवारांची हिस्ट्री माहिती
वसंतदादांपासून आम्हाला शरद पवारांची हिस्ट्री माहिती आहे. ते बाळासाहेबांचे मित्र होते. त्यांनी आम्हाला आणले आणि स्वतःच निघून गेले. मी शरद पवारांना बाळासाहेबांसारखे मानतो, मात्र ते आज निघून गेले, आम्हाला दुःख झाले, असे खैरे म्हणाले. आता महाविकास आघाडीत राष्ट्रवादी राहण्याचा संबंध नाही. राष्ट्रवादीने उघड बंड केले आहे, असे खैरे म्हणाले. आम्हाला महाविकास आघाडीमध्ये ढकलून हे स्वतः पळून गेले. आम्हाला एकत्र आणले आणि तेच पळून गेले, असे खैरे म्हणाले. आमचे काय राहिले, आमचे एवढे आयुष्य गेले, यांच्या मागे आम्ही भरकटून गेलो, असेही ते म्हणाले. शिंदेंचे लोक पहा, असे खैरे म्हणाले.
सोमवारपासून संसदेचे अधिवेशन
सोमवारपासून लोकसभेचे अधिवेशन सुरू होणार असून त्यामध्ये केंद्र सरकारकडून मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाचे विधेयक पटलावर मांडण्यात येणार आहे. गेल्या वेळीही सरकारने मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र विरोधकांच्या एकजुटीमुळे ते होऊ शकले नव्हते. त्यामुळे आता तीन दिवसीय अधिवेशनात पुन्हा एकदा हे विधेयक संसदेत मांडण्यात येणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा