जळगावमध्ये एका १८ वर्षीय तरुणीची दात कोरण्याची सवय तिच्या जीवावर बेतली. सेफ्टी पिनने दात टोकरत असताना चुकून पिन तिच्या पोटात गेली. टोकदार पिन अन्ननलिकेत अडकल्याने कुटुंबीय घाबरून गेले आणि त्यांनी तात्काळ तिला रुग्णालयात नेले.
जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कान, नाक व घसा विभागाच्या डॉक्टरांनी तरुणीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांनी अत्यंत सावधगिरीने अन्ननलिकेतून पिन बाहेर काढली. पिन निघाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगिता बावस्कर यांच्यासह वैद्यकीय पथकाने तरुणीचा जीव वाचवला.
अन्ननलिकेत अडकलेली पिन कशी काढली?
टोकदार सेफ्टी पिन अन्ननलिकेत अडकल्याने वैद्यकीय पथकासमोर मोठे आव्हान होते. पिनमुळे अन्ननलिकेला इजा होण्याचा धोका होता. मात्र कान, नाक व घसा विभागाच्या डॉक्टरांनी सावधपणे शस्त्रक्रिया करत पिन यशस्वीपणे बाहेर काढली. शस्त्रक्रियेनंतर तरुणीची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
दात कोरण्याची सवय का धोकादायक?
अनेकांना जेवणानंतर हातात मिळेल त्या छोट्या वस्तूने दात टोकरायची सवय असते. मात्र ही सवय जीवघेणी ठरू शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. पिन, सुई, खिळे किंवा कडक टूथपिक यांसारख्या टोकदार वस्तूंनी दात कोरू नयेत; त्यामुळे हिरड्यांना जखम होऊन संसर्ग होऊ शकतो किंवा दाताचे इनॅमल खराब होऊ शकते. दातांमधील अडकलेले कण काढण्यासाठी फ्लॉस किंवा इंटरडेंटल ब्रश वापरावा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा