देशात लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा म्हणजेच डिलिमिटेशनचा मुद्दा चर्चेत आहे. त्याचदरम्यान घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी एक महत्त्वाचा घटनात्मक प्रश्न उपस्थित केला आहे. लोकसभेच्या जागा वाढवून ८५० केल्या गेल्या, मात्र राज्यसभेच्या जागा २५० इतक्याच राहिल्या, तर देशाच्या संघराज्य व्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, अशी शंका बापट यांनी व्यक्त केली आहे. या संभाव्य बदलाला घटनात्मक आव्हान दिले जाण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.
दोन्ही सभागृहांमधील समतोल बिघडण्याची भीती
लोकसभेत देशातील नागरिकांचे प्रतिनिधित्व असते, तर राज्यसभेत राज्यांचे प्रतिनिधित्व केले जाते. अशा परिस्थितीत लोकसभेचे संख्याबळ मोठ्या प्रमाणात वाढले आणि राज्यसभेचे संख्याबळ कायम राहिले, तर संसदेतील दोन्ही सभागृहांमधील समतोलावर परिणाम होऊ शकतो, असे बापट यांनी स्पष्ट केले. नव्या बदलामुळे लोकसभेचे वर्चस्व वाढून राज्यसभेचे महत्त्व कमी होण्याची शक्यता असल्याचेही ते म्हणाले.
मूलभूत रचनेचा मुद्दा
भारतीय राज्यघटनेतील संघराज्य व्यवस्था ही मूलभूत रचनेचा भाग असल्याचे बापट यांनी नमूद केले. १९७३ मधील केशवानंद भारती खटल्याचा संदर्भ देत संसदेला राज्यघटनेत दुरुस्ती करण्याचा अधिकार असला, तरी राज्यघटनेच्या मूलभूत रचनेत बदल करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
प्रतिक्रिया व्यक्त करा