आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत हृदयविकाराचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, मानसिक तणाव आणि धूम्रपान यांसारख्या सवयींचा थेट परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होतो. मात्र रोजच्या जीवनातील काही छोट्या सवयी बदलल्यास हृदय निरोगी ठेवता येते, असे हृदयरोगतज्ज्ञ सांगतात. अशा सात महत्त्वाच्या बदलांविषयी जाणून घेऊया.
दैनंदिन सवयींमध्ये करा हे बदल
दररोज शारीरिक हालचाल: अनेकजण तासन्तास एकाच जागी बसून काम करतात. सतत बसून राहणे हृदयासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. जिममध्ये जाणेच गरजेचे नाही; वेगाने चालणे, सायकल चालवणे, पोहणे किंवा नृत्य करणे यांसारखे व्यायामही उपयुक्त ठरतात. सुरुवातीला दररोज २० ते ३० मिनिटे चालण्यापासून सुरुवात करावी. प्रौढ व्यक्तींनी आठवड्याला किमान १५० मिनिटे व्यायाम करण्याचे उद्दिष्ट ठेवावे.
पौष्टिक आहार: हृदयाच्या आरोग्यासाठी योग्य आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. रोजच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या, फळे, कडधान्ये, डाळी, संपूर्ण धान्य, सुका मेवा आणि बिया यांचा समावेश करावा. मिठाचे, साखरेचे आणि संतृप्त चरबीचे प्रमाण मर्यादित ठेवावे. पॅकेज्ड पदार्थ, जंक फूड आणि तळलेले पदार्थ शक्यतो टाळावेत. संतुलित आहारामुळे वजन आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.
धूम्रपान आणि तंबाखू टाळा: धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन हृदयासाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. केवळ धूम्रपान करणाऱ्यांनाच नव्हे, तर त्यांच्या आसपास राहून धुराच्या संपर्कात येणाऱ्यांनाही धोका असतो.
पुरेशी झोप घ्या: रात्री उशिरापर्यंत मोबाईल किंवा टीव्ही पाहण्याची सवय झोपेचे वेळापत्रक बिघडवते. अपुऱ्या झोपेचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो. प्रौढ व्यक्तींनी दररोज साधारण ७ ते ९ तास झोप घ्यावी. रोज ठरावीक वेळी झोपणे आणि ठरावीक वेळी उठणे याची सवय लावावी.
तपासणी आणि लक्षणांकडे दुर्लक्ष नको
मानसिक तणाव नियंत्रणात ठेवा: कामाचा ताण, कौटुंबिक समस्या आणि धावपळीमुळे मानसिक तणाव वाढतो. दीर्घकाळ तणाव राहिल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तणाव कमी करण्यासाठी योगासने, ध्यान, प्राणायाम आणि नियमित चालण्याचा सराव करावा. सतत तणाव जाणवत असल्यास मानसिक आरोग्यतज्ज्ञांची मदत घ्यावी.
रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॉल तपासा: उच्च रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे वाढलेले प्रमाण अनेकदा सुरुवातीला कोणतीही लक्षणे दाखवत नाही. मात्र दीर्घकाळ ही समस्या नियंत्रणाबाहेर राहिल्यास हृदयावर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वेळोवेळी रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची तपासणी करणे आवश्यक आहे. कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास असल्यास विशेष काळजी घ्यावी.
वजन नियंत्रणात ठेवा: पोटाभोवती जमा होणारी अतिरिक्त चरबी हृदयविकारासह अनेक आरोग्य समस्यांचा धोका वाढवू शकते. त्यामुळे संतुलित आहार आणि नियमित व्यायामाच्या मदतीने वजन नियंत्रणात ठेवावे. वजन कमी करण्यासाठी अचानक उपवास किंवा क्रॅश डाएटचा अवलंब टाळावा.
लक्षणे दिसल्यास तातडीने मदत घ्या: छातीत अचानक दुखणे, चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडल्यासारखे वाटणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा थंड घाम येणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे; कोणतीही आरोग्य अडचण असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
प्रतिक्रिया व्यक्त करा