राज्य सरकारने लोककल्याणकारी निर्णय घेतला आहे. २०११ सालापर्यंतची सरकारी जमिनीवरील निवासी अतिक्रमणं नियमित केली जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा निर्णय घेतला असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी विधानसभास्तरीय सहअध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी झाला असून, राज्यभरात ११५ सहअध्यक्ष नियुक्त केले जाणार आहेत.
लाखो कुटुंबांना दिलासा
राज्यात सरकारच्या मालकीची लाखो एकर जमीन आहे. त्यातील काही जमिनीवर लोकांनी अतिक्रमण करून घरं बांधली आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून लोक त्या घरांमध्ये राहतात, मात्र अतिक्रमित जागा असल्याने घर कधीही पाडले जाईल, अशी भीती त्यांना होती. त्यामुळे घरं न पाडता जमिनी मालकी हक्काच्या कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. नागरिकांची हीच मागणी लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो सर्वसामान्य कुटुंबांच्या डोक्यावरील बेघर होण्याची टांगती तलवार कायमची दूर होणार आहे. घरांना कायदेशीर मालकी हक्क मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.
अंमलबजावणी कशी होणार?
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विधानसभास्तरीय सहअध्यक्षांची नियुक्ती केली आहे. या प्रक्रियेला वेग आला आहे. मात्र, या निर्णयाचा नेमका किती लोकांना फायदा होणार आणि लाभ मिळवण्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता करावी लागणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे पुढील काळात याबाबतची सविस्तर माहिती समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा