देशाच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजपाच्या धोरणांना विरोध करणारा शरद पवार यांचा पक्ष मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे. पडद्यामागे तशा हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
इंडिया आघाडीच्या बैठकीला अनुपस्थिती?
आज, २८ नोव्हेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे जाणार नाहीत. त्यांच्याऐवजी खासदार निलेश लंके आणि अमोल कोल्हे बैठकीला जाणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र आता पवार गटाचा एकही प्रतिनिधी या बैठकीला जाणार नसल्याचे बोलले जात आहे. यामुळे इंडिया आघाडीत मोठी फूट पडली आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
चोरमारे यांचे भाकित
यावर राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी भाष्य केले आहे. त्यांच्या मते, पवार गटाचे खासदार इंडिया आघाडीच्या बैठकीला जाणार नसतील तर हे गंभीर आहे. याचा अर्थ शरद पवार गट इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचेही असू शकते; मात्र दुपारी होणाऱ्या बैठकीची वाट पाहावी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.
चोरमारे यांच्या मते, इंडिया आघाडीच्या बैठकीला शरद पवार यांच्या पक्षाचा कोणताही प्रतिनिधी उपस्थित नसेल तर त्यातून काही बाबी स्पष्ट होतात. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या अनुषंगाने पवार गटाने एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचाही अर्थ त्यातून निघू शकतो. मात्र जोपर्यंत विधेयक संसदेत येत नाही आणि मतदानाला येत नाही, तोपर्यंत पवार गटाची भूमिका स्पष्ट होत नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा