मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दिल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. येत्या आठवड्यात होणाऱ्या विशेष अधिवेशनात हे विधेयक मांडले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष या विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसने सोशल मीडियावर दोन पोस्ट शेअर करून शरद पवार यांना जुन्या आठवणींची आठवण करून दिली आहे.
राहुल गांधींच्या आधाराची आठवण
काँग्रेसने इन्स्टाग्रामवर राहुल गांधी आणि शरद पवार यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राहुल गांधी शरद पवार यांचा हात घट्ट पकडलेले दिसत आहेत. फोटोसोबत ‘गद्दारांची मांदियाळी असताना राहुल गांधींनी शरद पवार साहेबांना भक्कम आधार दिला होता’, अशी ओळ लिहिली आहे. दुसऱ्या पोस्टमध्ये शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेसने केलेल्या त्यागाची आठवण करून देण्यात आली आहे.
मार्च २०२६ मधील राज्यसभा निवडणूक
मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अवघे दहा आमदार होते, तर एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी ३६ मतांची गरज होती. काँग्रेसकडे १६ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे २० आमदार होते. सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेतृत्वाकडे पाठिंबा मागितला. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी कोणतीही अट न घालता सकारात्मक भूमिका घेतली. काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवून शरद पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेनेनेही पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीने एकमताने त्यांची उमेदवारी निश्चित केली. काँग्रेसने पोस्टच्या शेवटी प्रश्न उपस्थित केला आहे की, तेच शरद पवार आणि त्यांचा पक्ष आता परिसीमन कायद्याच्या पार्श्वभूमीवर भाजप सरकारला पाठिंबा देणार आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा