पाकिस्तानी टीव्ही मालिका दर-ए-निजातच्या बंगळुरूमधील दोन खासगी स्क्रीनिंग्ज रद्द करण्यात आल्या आहेत. ऑनलाइन विरोध आणि पोलिसांच्या चौकशीनंतर हे कार्यक्रम रद्द झाले. भारतात ही मालिका सोशल मीडियावर मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे.
बुधवारपर्यंत बंगळुरूमधील काही मालिकाप्रेमींच्या वीकेंडच्या योजनेत या स्क्रीनिंगचा समावेश होता. उत्तम जेवणासोबत मालिकेचे पुढचे भाग एकत्र पाहण्याची त्यांची योजना होती. मात्र विरोध वाढल्यानंतर आयोजकांना दोन्ही कार्यक्रम रद्द करावे लागले.
बंगळुरूमधील दोन्ही कार्यक्रम कसे होते
एक स्क्रीनिंग शनिवारी एका रेस्टॉरंटमध्ये होणार होतं. त्यासाठी माफक शुल्क आकारण्यात येणार होतं आणि फारसी व अरबी जेवणासोबत मालिकेचे दोन भाग दाखवले जाणार होते.
दुसरं स्क्रीनिंग एका खासगी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आलं होतं. ते फक्त कुटुंबीयांसाठी होतं. पाहुण्यांना त्यांच्या सर्वात आकर्षक पाकिस्तानी पोशाखात येण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.
ही मालिका पाकिस्तानमधील एआरवाय डिजिटल वाहिनीवर प्रसारित होते. भारतातील प्रेक्षक काही यूट्यूब चॅनेलवर ती पाहू शकतात, मात्र वाहिनीचं अधिकृत यूट्यूब चॅनेल भारतात ब्लॉक करण्यात आलं आहे.
भारतात पाकिस्तानी मालिकांची मागणी पुन्हा वाढताना दिसत आहे, अशावेळी हा वाद पुढे आला आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या तीव्र लष्करी संघर्षानंतर सांस्कृतिक देवाणघेवाण अजूनही संवेदनशील विषय मानली जाते.
दिल्लीतील कार्यक्रम आणि नेटफ्लिक्सवरील मालिका
गेल्या आठवड्यात दिल्लीतही असाच एक कार्यक्रम झाला होता. त्यामध्ये मालिकेशी संबंधित प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम आणि दिग्दर्शकाशी ऑनलाइन संवादाचाही समावेश होता. या कार्यक्रमावरून सोशल मीडियावर आधीच चर्चा सुरू झाली होती.
दरम्यान, ऑल इंडिया सिनेवर्कर्स असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून नेटफ्लिक्सच्या आगामी पाकिस्तानी मालिकेचं भारतातील प्रदर्शन रोखण्याची मागणी केली आहे. जो बचे हैं संग समेट लो या मालिकेचा जागतिक प्रीमियर 4 डिसेंबर रोजी होणार आहे.
या मालिकेत फवाद खान, माहिरा खान, सनम सईद आणि भारतात मोठा चाहता वर्ग असलेले इतर कलाकार आहेत. ही पाकिस्तानची पहिली नेटफ्लिक्स ओरिजिनल मालिका आहे.
मंगळवारी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात असोसिएशनने म्हटलं की, ही मालिका भारतात प्रदर्शित करणं म्हणजे दहशतवादी हल्ल्यांमुळे प्रभावित झालेल्या कुटुंबांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणं ठरेल. भारत दीर्घकाळापासून पाकिस्तानवर सीमेपार दहशतवादाला पाठिंबा देत असल्याचा आरोप करत आला आहे, तर पाकिस्तान हे आरोप फेटाळत आला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा