गोव्यात सुरू असलेल्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ‘द केरळ स्टोरी 2 : गोज बियॉन्ड’ आणि ‘डेमोग्राफी इज डेस्टिनी’ या चित्रपटांच्या निर्मितीप्रक्रियेचा उलगडा करण्यात आला. व्यक्तिरेखांवर आधारित कथन, संशोधनाधारित चित्रनिर्मिती आणि विविध विषय प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यातील आव्हाने यांवर दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंह आणि निर्माते रवींद्र सांघवी यांनी आपले अनुभव मांडले.
तीन कथांचा एक भावनिक धागा
चित्रपटातील विविध कथांना एकत्र गुंफताना त्यांचा समान भावनिक धागा कायम ठेवणे हे दिग्दर्शकीय आव्हान असल्याचे सिंह यांनी सांगितले. ‘द केरळ स्टोरी 2’ हा व्यक्तिरेखांभोवती फिरणारा चित्रपट असून त्यात तीन स्वतंत्र कथांचा समावेश आहे. या कथांना जोडण्यात संगीताची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चित्रपटासाठी प्रकरणांचा अभ्यास आणि तथ्याधारित संदर्भांचा आधार घेण्यात आला असून व्यक्तिरेखांचे अनुभव आणि भावविश्वातून कथा मांडण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.
आकडेवारीचे रंजक दृश्यकथन
‘डेमोग्राफी इज डेस्टिनी’ या माहितीपटाविषयी बोलताना आकडेवारीचे प्रभावी आणि रंजक दृश्य कथनात रूपांतर करणे हे मोठे आव्हान असल्याचे सांघवी आणि सिंह यांनी नमूद केले. गुंतागुंतीची माहिती प्रेक्षकांना सहज समजण्यासाठी त्यांच्या परिचयाच्या वाटतील अशा व्यक्तिरेखांची निवड महत्त्वाची ठरते, असे सिंह म्हणाले. माहितीपटाच्या निर्मितीत सुरुवातीला आकडेवारी संकलित करून मुलाखती घेतल्या जातात. त्यानंतर अनुभवांच्या आधारे कथेला आकार देऊ शकतील अशा व्यक्तींचा शोध घेतला जातो, असे त्यांनी सांगितले. चित्रपटातील दृश्यांची विश्वासार्हता जपण्यासाठी चित्रीकरणाच्या स्थळांची निवडही महत्त्वाची असल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले. विविध ठिकाणांना दिलेल्या भेटी आणि तेथील वातावरणाच्या परिचयामुळे कथेला अनुरूप स्थळे निवडणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपट अधिक व्यापक प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचविण्यात समाजमाध्यमांची भूमिकाही महत्त्वाची असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. इफ्फीसारखा महोत्सव विविध प्रदेश, भाषा आणि निर्मितीच्या पार्श्वभूमीतील चित्रपटांना एकाच व्यासपीठावर आणतो, असे सिंह यांनी सांगितले. वेगवेगळ्या आर्थिक आणि तांत्रिक साधनांवर चित्रपट निर्मिती करणाऱ्या चित्रकर्मींना येथे आपले काम सादर करण्याची संधी मिळते. डिजिटल स्ट्रीमिंग माध्यमांचा प्रसार होण्यापूर्वी इफ्फीमुळे आपल्याला आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि चित्रकर्मींशी परिचय झाल्याची आठवणही त्यांनी सांगितली. महोत्सवाची ‘स्टोरीज विदाउट बॉर्डर्स’ ही संकल्पना विविध सिनेमांना एकत्र आणण्याच्या इफ्फीच्या भूमिकेशी सुसंगत असल्याचे सिंह म्हणाले. लहान प्रदेशांतील आणि कमी परिचित भाषांमधील चित्रपटांना व्यापक प्रेक्षकवर्ग मिळवून देण्यासाठी अशा महोत्सवांचे महत्त्व असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन कुलदीप मीना यांनी केले.
प्रतिक्रिया व्यक्त करा