महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. 25 जून 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरात क्रमांक 017/2026 तसेच त्यानंतरच्या शुद्धिपत्रकांच्या अनुषंगाने ही मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ज करण्यास पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सुधारित वेळापत्रक काय आहे?
आयोगाने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 साठी सुधारित वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 29 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत आहे. उमेदवारांनी ही अंतिम मुदत लक्षात घेऊन वेळेत अर्ज आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
शुद्धिपत्रकामुळे पात्र उमेदवारांना संधी
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या 27 नोव्हेंबर 2026 रोजीच्या पत्रानुसार प्राप्त अभिप्रायानुसार समतुल्य शैक्षणिक अर्हतांच्या संदर्भात 27 नोव्हेंबर रोजी शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आली असून, आता 27 नोव्हेंबर 2026 रोजी समतुल्य शैक्षणिक अर्हतांबाबत नवे शुद्धिपत्रक प्रसिद्ध झाल्याने, अर्ज सादर करण्यास पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना संधी मिळावी यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा