लग्नाचा आनंद दोन दिवसही टिकला नाही. लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी आयोजित करण्यात आलेल्या रिसेप्शनमध्ये नवरदेव अचानक स्टेजवर कोसळला आणि रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. बिहारच्या कटिहार जिल्ह्यात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर शोककळा पसरली आहे.
पवन कुमार यादव असे मृत्यूमुखी पडलेल्या नवरदेवाचे नाव आहे. पवन हे पेशाने आयुष डॉक्टर होते आणि पाटण्यात वास्तव्यास होते. कटिहार जिल्ह्यातील फलका येथील पोठिया बाजार परिसरातील प्रभाग क्रमांक १३ मध्ये ही हृदयद्रावक घटना घडली.
पवन कुमार यादव यांचा विवाह २५ नोव्हेंबरला दिरा चांदपूर गावात झाला. कुटुंबाने धुमधडाक्यात चांदपूरला वरात नेली होती आणि लग्न सोहळा विधीवत संपन्न झाला. २६ नोव्हेंबरला पवन त्यांच्या पत्नीसह घरी परतले. लग्नानंतर त्याच संध्याकाळी कुटुंबाने रिसेप्शनचे आयोजन केले होते. नातेवाईक, ग्रामस्थ आणि परिचितांनी वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी गर्दी केली होती.
स्टेजवर अचानक कोसळले
रिसेप्शनला नवरदेव आणि त्यांची नवरी स्टेजवर बसले होते. पाहुणे जेवत होते. काही जण नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी स्टेजवर आले होते. कार्यक्रम अंतिम टप्प्यात होता. याच दरम्यान पवन स्टेजवर अचानक कोसळले. पवन यांना कोसळताना पाहून कुटुंबीय घाबरले. कुटुंबियांनी नातेवाईकांच्या मदतीने त्यांना फलका आरोग्य केंद्रात नेले.
रुग्णालयात नेताना वाटेतच मृत्यू
तिथल्या डॉक्टरांनी पवन यांची गंभीर स्थिती पाहता त्यांना चांगल्या उपचारांसाठी पूर्णियाला पाठवले. पण पूर्णियाला नेत असताना पवन यांची प्राणज्योत मालवली. एक दिवस आधी सप्तपदी घेतलेल्या नवरदेवाची दुसऱ्या दिवशी अंत्ययात्रा निघाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. नवरदेवाच्या अकाली निधनाने दोन्ही कुटुंबांना जबर धक्का बसला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा