राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे आणि बारमतीत आंदोलन करण्यात आले. यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. आपली कथित निष्ठा सिद्ध करण्यासाठी काही जणांनी पुण्यात आणि बारामतीत माझ्याविरोधात आंदोलन केल्याचे कळले. पण रस्त्यावर उतरण्यापूर्वी त्यांनी माझ्या बोलण्याचा नेमका अर्थ नीट समजून घ्यायला हवा होता, असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. प्रशासनावर मजबूत कमांड असलेल्या अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असे रोहित पवार म्हणाले.
सुनेत्रा काकींच्या क्षमतेवर प्रश्न नाही
स्वतःचे वेगळे अस्तित्व प्रत्येक व्यक्ती निर्माण करू शकतो. पण हा त्यांच्या कष्टाचा आणि जिद्दीचा विषय आहे. तसे अस्तित्व सुनेत्रा काकीही निर्माण करतील, याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही. पण दादा गेल्यानंतर पुणे आणि बारमतीत गुन्हेगारी ज्या वेगाने वाढली, त्यावर आम्ही बोलायचे नाही का? असा सवाल देखील रोहित पवारांनी उपस्थित केला. कोणत्याही महिलांच्या क्षमतेबाबत आम्हाला तिळमात्र शंका नाही; देशाच्या सर्वात कणखर पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी होत्या, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे सुनेत्रा काकींच्या क्षमतेवरही आमचा प्रश्न नाही. एखाद्या पदावरील व्यक्तीवर जेव्हा टीका केली जाते तेव्हा ती लोकांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने त्या पदावर बसलेल्या पुरुषावर किंवा महिलेवर केलेली टीका नसते, तर त्या पदावर केलेली टीका असते, हे आधी समजून घेतले पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले.
भाजपवर पंख छाटण्याचा आरोप
दादांच्या कामाची बरोबरीही कुणीच करू शकत नाही, हे सत्य नाही का? असा सवाल रोहित पवारांनी केला. याचाच फायदा उठवत भाजपने सुनेत्रा काकींचे पंख छाटण्याचे राजकारण केले नाही का? आधी त्यांच्या पक्षाकडील अर्थखाते काढून घेतले आणि आता त्यावर ब्र शब्दही काढत नाहीत, त्यावर देखील हे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत का? आज त्या पुण्याच्या पालकमंत्री जरूर आहेत, पण त्यांना पूर्ण अधिकार दिलेत का? नसतील दिले तर त्यावर देखील ही मंडळी आंदोलन करणार आहे का? असा सवाल रोहित पवारांनी केला.
पुण्याचे पोलीस आयुक्त हे मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांशिवाय कुणालाच जुमानत नाहीत, तर सत्तेतील इतर पक्षाच्या नेत्यांचे काय? आणि यामागील भाजपचे राजकारण आंदोलन करणाऱ्या या मंडळींना समजणार आहे का? मी काहीही चुकीचे बोललो नाही, तरीही माझ्या बोलण्यामुळे सुनेत्रा काकींना वाईट वाटले असेल तर मी कालच जाहीर माफी मागितली आणि सुनेत्रा काकींना पूर्ण ताकद देऊन पालकमंत्र्यांचे आदेश पाळा असे सक्त निर्देश पोलीस आयुक्तांना द्यावेत, अशी स्पष्टपणे मागणी केल्याचे रोहित पवार म्हणाले. मग यात सुनेत्रा काकींचा अवमान कुठे झाला? उलट त्यांना अधिकार मिळावेत म्हणून ही मागणी करणे चूक आहे का? असा सवाल रोहित पवारांनी केला.
पुण्यात भरदिवसा खून, गोळीबार आणि कोयता गँगचा धुमाकूळ सुरू असताना आम्ही तोंडाला कुलूप लावून बसायचे का? या गुन्हेगारीचा फटका पोलीस संरक्षणात फिरणाऱ्या नेत्यांना कधीच बसत नाही, तर सामान्य माणसे याचे बळी ठरतात. त्यावर आम्ही बोलायचे नाही? अंधभक्ती तुम्ही जरूर करा, पण चुकीच्या गोष्टींवर आम्ही आवाज उठवतच राहणार! कुणाचाही अवमान न करता जर पदावरील व्यक्तीला प्रश्न विचारणे गुन्हा असेल, तर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी याचे उत्तर द्यावे. शेवटी, आंदोलन करणारे कार्यकर्ते हे दुसऱ्या पक्षाचे आहेत तरीही त्यांना माझी विनंती आहे की, अजितदादांच्या अपघाताच्या / घातपाताच्या चौकशीसाठी आणि पुण्याच्या रिंगरोडला दादांचे नाव देण्यासाठीही तुम्ही आंदोलन करा आणि यासाठी आम्ही ज्यावेळी आंदोलन करू त्यातही तुम्ही सहभागी व्हा.
प्रतिक्रिया व्यक्त करा