राज्यात एकीकडे दुष्काळाची परिस्थिती असताना चंद्रपूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी स्वतःचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. आज आयोजित सर्वसाधारण सभेत मानधनवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे नगरसेवकांना आता दरमहा २० हजार रुपये मानधन मिळणार आहे. यापूर्वी त्यांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिले जात होते. या निर्णयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
आमदार, खासदार किंवा राजकीय पुढारी सत्ताधारी आणि विरोधक म्हणून सातत्याने एकमेकांसमोर उभे असतात. अनेकदा विविध मुद्यांवरून त्यांच्यात मतभेद होतात. मात्र स्वतःसाठी काही मागायचे असेल तर त्यांचा एकोपा पाहायला मिळतो. खासदारांच्या कँटीनचा विषय असो, आमदारांच्या पगारवाढीचा विषय असो किंवा आमदार निवास नव्याने बांधण्याचा विषय असो, सर्वजण एकमेकांना पाठिंबा देतात. चंद्रपूर महापालिकेतही आज अशाच प्रकारे निर्णय घेण्यात आला.
सभेत गदारोळ, मानधनावर मात्र एकमत
चंद्रपूर महानगरपालिकेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत भुयारी गटार योजना आणि अमृत-२ पाणीपुरवठा योजनेच्या मुद्द्यावरून नगरसेवकांमध्ये जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. चंद्रपूर महानगरपालिका आणि गोंधळ हे समीकरण नेहमीचेच झाले आहे. मात्र नगरसेवकांच्या मानधनवाढीचा विषय सभेत येताच सर्वच नगरसेवक गुण्यागोविंदाने एकत्र आल्याचे चित्र दिसून आले.
दुष्काळात मानधनवाढीवर चर्चा
राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना अनेक प्रशासकीय कामांना ब्रेक लागला आहे. विविध विकासकामांवर आर्थिक मर्यादा आणि निर्बंध आणले जात आहेत. अशा दुष्काळी परिस्थितीत स्वतःच्या मानधनवाढीच्या मुद्द्यावर नगरसेवकांनी दाखवलेली एकजूट लक्षवेधी ठरली आहे. दुष्काळ असताना लोकप्रतिनिधींनी स्वतःचे मानधन दुप्पट केल्याने या निर्णयावर आता विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा