डिलिमिटेशन, अर्थात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून देशातील राजकीय वातावरण तापले असतानाच इंडिया आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विरोधी पक्षांमधील काही घटकांनी या विधेयकाला विरोध दर्शवला आहे, तर काहींनी अटींसह समर्थन देण्याची भूमिका घेतली आहे. मात्र बिहारमधील लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने या विधेयकाला थेट पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
केंद्र सरकारने विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दिल्यानंतर संसदेच्या विशेष अधिवेशनात ते मांडण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
RJD ची भूमिका काय?
राष्ट्रीय जनता दलाचे खासदार सुरेंद्र प्रसाद यादव यांनी पत्रकार परिषदेत पक्षाची भूमिका स्पष्ट करताना मतदारसंघ पुनर्रचनेचे समर्थन केले. देशातील वाढती लोकसंख्या, विकासकामांचा विस्तार आणि उपलब्ध संसाधनांवरील वाढता ताण लक्षात घेता मतदारसंघांचे परिसीमन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
लोकसंख्येच्या प्रमाणात लोकप्रतिनिधींचे प्रमाण वाढल्यास नागरिकांच्या समस्या संसदेत अधिक प्रभावीपणे मांडता येतील, असेही यादव यांनी स्पष्ट केले. लोकसभेच्या जागा वाढवण्याच्या निर्णयालाही त्यांनी समर्थन दर्शवले.
परिसीमनाची प्रक्रिया भविष्यातील लोकसंख्यावाढ आणि विकासाच्या गरजा लक्षात घेऊन आतापासूनच सुरू करणे आवश्यक असल्याचे सुरेंद्र यादव यांनी म्हटले. २०२७ मध्ये लोकसंख्यावाढीचे मुद्दे समोर आल्यानंतर अचानक निर्णय घेण्यापेक्षा आधीच तयारी केलेली चांगली, अशी भूमिका त्यांनी मांडली.
विधेयक पुढे काय?
मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यास लोकप्रतिनिधींना आपल्या कार्यक्षेत्रात अधिक प्रभावीपणे काम करता येईल, असे यादव यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुनर्रचनेला विरोध करण्याऐवजी ती वेळेत पूर्ण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
इंडिया आघाडीतील एका महत्त्वाच्या घटक पक्षाने विधेयकाला पाठिंबा दिल्याने आघाडीतील मतभेद आता उघडपणे समोर आले आहेत. या विधेयकावर संसदेत होणाऱ्या चर्चेकडे आणि मतदानाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा