बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सुमारे २५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या या गावात आजही शुद्ध आणि नियमित पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था उपलब्ध नाही. नळ कोरडे पडले असून, विकत घेऊनही पाणी मिळणे कठीण झाले आहे. या परिस्थितीविरोधात संतप्त महिलांनी संविधानदिनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली.
विकतचे पाणीही पुरेसे नाही
गावातील नागरिकांना सध्या ५० ते ६० रुपये प्रति बॅरल दराने पाणी विकत घ्यावे लागत आहे. मात्र दुष्काळाची तीव्रता वाढत असताना विकत घेऊनही सर्वांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. गावासाठी विविध नळ योजनांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले जाते, तरी अद्याप एकही योजना पूर्णत्वास गेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे दरवर्षी पाणीटंचाईचा प्रश्न कायम राहतो आणि पाण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागते.
प्रशासक अनुपस्थित; पद्मावती धरणाचे आश्वासन
गुरुवारी महिला ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचल्या तेव्हा प्रशासक तसेच ग्रामसेवक कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे महिलांचा संताप आणखी वाढला. पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी करत महिलांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायतीकडून वेळोवेळी पद्मावती धरणातून देऊळघाटला पिण्याचे पाणी आणण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र प्रत्यक्षात या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही.
दुष्काळाचा फटका केवळ पिण्याच्या पाण्यापुरता मर्यादित नाही. जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळालेले नाही. त्यामुळे जनावरांसाठी वर्षभर साठवून ठेवला जाणारा कडबा आणि चारा उपलब्ध होण्याचे प्रमाण घटले आहे. दूध विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा आता चाऱ्याच्या खरेदीवर खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुग्धव्यवसाय करणारे छोटे पशुपालकही आर्थिक अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा