घटलेली भूजल पातळी आणि दुष्काळाचे संकट यामुळे कोरडवाहू पट्ट्यातील शेतकरी आता पारंपरिक शेतीसोबत नवे प्रयोग करून पाहत आहेत. भाजीपाल्यापासून फळपिकांपर्यंत प्रयोग करण्याचे धाडस शेतकरी दाखवत आहेत. कमी पाण्यात आणि प्रतिकूल हवामानातही तग धरून राहणारे ड्रॅगन फ्रुट हे पीक दुष्काळी आणि कोरडवाहू शेतीसाठी एक नवीन आणि आशादायी पर्याय ठरू शकते. काही शेतकऱ्यांनी ड्रॅगन फ्रुटची लागवड स्वीकारली आहे. एकदा लागवड केल्यावर पुढील काही वर्षे फळे मिळत असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होतो.
कमी पाणी लागणारे, तग धरणारे पीक
ड्रॅगन फ्रुट हे प्रामुख्याने कॅक्टस म्हणजे निवडुंग वर्गातील पीक असल्याने त्याला अत्यंत कमी पाणी लागते. कोरडवाहू आणि कमी पावसाच्या पट्ट्यातही हे पीक येते. पारंपरिक पिकांच्या तुलनेत त्याला कमी पाणी लागते. पाणीटंचाईच्या काळात तसेच उष्ण आणि दमट वातावरणातही हे पीक तग धरते. ठिबक सिंचनाची जोड मिळाल्यास उत्पादनात आणखी भर पडते.
ड्रॅगन फ्रुटसाठी पाण्याचा निचरा होणारी हलकी ते मध्यम प्रतीची जमीन चांगली मानली जाते. जमिनीचा सामू ५.५ ते ७.० दरम्यान असावा. जमिनीत पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी गादीवाफे तयार करून त्यावर लागवड करावी.
लागवडीची पद्धत आणि योग्य काळ
हे वेलवर्गीय पीक असल्याने त्याला आधाराची गरज असते. साधारणपणे १० ते १२ फूट बाय ७ ते ८ फूट अंतरावर ६ ते ७ फूट उंचीचे सिमेंट खांब रोवावे. खांबाच्या वरील बाजूला गोल रिंग अथवा जुने टायर बसवावे. त्यावरून फांद्या छत्रीसारख्या खाली येतात. पेरणीपूर्वी खड्ड्यात शेणखत, गांडूळ खत आणि ट्रायकोडर्मा मिसळावे.
ड्रॅगन फ्रुटची लागवड वर्षभरात कोणत्याही काळात करता येते. त्यासाठी एकच विशिष्ट हंगाम महत्त्वाचा नसतो. पण जून ते सप्टेंबर आणि फेब्रुवारी ते मार्च हा कालावधी या फळपिकासाठी योग्य मानला जातो. अतिउष्ण अशा मे महिन्यात या फळाची लागवड करणे टाळावे. पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड केल्यास नैसर्गिक ओलाव्याचा फायदा होतो. सिंचन व्यवस्था असेल तर फायदा होतो आणि ठिबक सिंचनामुळे उत्पादन वाढीसह खर्चही वाचतो.
प्रतिक्रिया व्यक्त करा