२०२७ च्या आयपीएल हंगामाच्या पार्श्वभूमीवर तीन वेळा विजेतेपद पटकावणारा कोलकाता नाईट रायडर्स संघ नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीनंतर फ्रँचायझीसमोर कर्णधार कोणाला करायचे, असा प्रश्न उभा राहिला आहे. आगामी हंगामात संघाचे नेतृत्व कोण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
१६ डिसेंबर रोजी गोव्यात होणाऱ्या मिनी-लिलावादरम्यान केकेआर संघ कर्णधारपदासाठी संभाव्य पर्यायांवरही लक्ष केंद्रित करणार आहे. याचदरम्यान भारतीय संघाचे माजी अष्टपैलू इरफान पठाण यांनी केकेआरचा नवा कर्णधार कोण होऊ शकतो, याबाबत भाकित केले आहे.
रिंकू सिंगकडे पठाण आणि चोप्रांचा कौल
आयपीएल २०२७ साठी रिंकू सिंग हा केकेआर संघाचा नवा कर्णधार होऊ शकतो, असे पठाण यांनी म्हटले आहे. त्याच्यासह माजी भारतीय क्रिकेटपटू आणि अनुभवी समालोचक आकाश चोप्रा यांनीही रिंकूच्या नेतृत्वाचे समर्थन केले आहे.
जिओस्टारशी बोलताना इरफान पठाण म्हणाले की, केकेआरचा कर्णधार म्हणून रिंकू सिंगला नियुक्त करण्याबाबत बरीच चर्चा सुरू आहे. सध्या संघाकडे नेतृत्वासाठी फारसे पर्याय उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत रिंकू हा सर्वोत्तम पर्याय आहे, असे त्यांचे मत आहे.
लिलावातून कर्णधार मिळवण्याचाही विचार
एखादी फ्रँचायझी लिलावाद्वारे संघात सामील करून घेतलेल्या खेळाडूला कर्णधारपदाची जबाबदारी सोपवू शकते, असेही पठाण यांनी सांगितले. यासंदर्भात त्यांनी वेस्ट इंडीजच्या शाई होपचे नाव या भूमिकेसाठी एक संभाव्य उमेदवार म्हणून सुचवले. शाई होपने नुकतीच भारतांविरुद्धची मालिका खेळली होती आणि त्यात त्याने चांगली कामगिरी केली होती.
फ्रँचायझी लिलावाद्वारे कर्णधार मिळवण्याचाही विचार करू शकते, असे पठाण म्हणाले. मात्र केकेआरच्या व्यवस्थापनाची काम करण्याची पद्धत पाहता रिंकूच नवा कर्णधार बनेल, असे त्यांना वाटते.
प्रतिक्रिया व्यक्त करा