अदाणी समूह आता देशाच्या विमान वाहतूक क्षेत्रात आपली पकड मजबूत करण्याची तयारी करत आहे. विमान वाहतूक व्यवसायात गुंतवणूक करून या क्षेत्रात प्रवेश करण्याचा समूहाचा मानस आहे. यासाठी समूहाने सरकारकडे परवानगी मागितली आहे. समूहाचे मुख्य वित्तीय अधिकारी जुगेशिंदर रॉबी सिंग यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.
दररोजची उड्डाणे दहा पटीने वाढण्याची गरज
भारतात साठ कोटींहून अधिक लोक हवाई प्रवास करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे देशातील दररोजच्या विमान उड्डाणांची संख्या सध्याच्या पातळीवरून भविष्यात अंदाजे दहा पटीने वाढवून तीस हजारांपर्यंत नेण्याची गरज भासेल, असे सिंग यांनी सांगितले. सरकारची मंजुरी मिळाल्यास अदाणी समूह विमान वाहतूक व्यवसायात गुंतवणूक करू शकेल आणि त्यामुळे इंडिगो आणि एअर इंडियासमोर स्पर्धा निर्माण होऊ शकते.
अदाणी एअरपोर्ट्स २०२७ पर्यंत शेअर बाजारात
अदाणी समूहाची उपकंपनी असलेली अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडही आपला व्यवसाय नव्या उंचीवर नेण्याची तयारी करत आहे. ही कंपनी २०२७ पर्यंत शेअर बाजारात सूचीबद्ध होण्यासाठी सज्ज होऊ शकते. यासाठी तिला मूळ कंपनीपासून वेगळे करण्याची योजना आखली जात आहे. अदाणी एअरपोर्ट्स आता आपल्या गुंतवणूक आणि विस्तार योजनांसाठी स्वतःचा निधी उभारण्याच्या स्थितीत असल्याचे सिंग यांनी सांगितले. मात्र कंपनीच्या संचालक मंडळाने लिस्टिंगची विशिष्ट तारीख अद्याप निश्चित केलेली नाही. इंडिया डेट कॅपिटल मार्केट समिटदरम्यान माध्यमांशी बोलताना सिंग यांनी ही माहिती दिली.
प्रतिक्रिया व्यक्त करा