बिहारच्या मोकामा मतदारसंघाचे आमदार अनंत सिंह यांच्या मुलीच्या लग्नाची देशभरात जोरदार चर्चा रंगली आहे. शिवांगी सिंह यांच्या विवाहसोहळ्यात कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पाहुण्यांना दहा लाख रुपयांचे रसगुल्ले खाऊ घालण्यात आले, तर १५० पेक्षा अधिक खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे चार लाख पाहुणे या लग्नाला आले होते. पाहुण्यांना थार गाड्या भेट म्हणून देण्यात आल्या, तर ने-आण करण्यासाठी हेलिकॉप्टरचीही व्यवस्था करण्यात आली होती. बिहारचा पारंपरिक लिट्टी-चोखा यासह अनेक पदार्थ पंगतीत वाढण्यात आले. अनेक बड्या नेत्यांनी या लग्नाला हजेरी लावली.
वर्दीतील व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल
या लग्नात वर्दीतील एक व्यक्ती पंगतीमध्ये पत्रावळ्या वाटताना दिसल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. आमदाराच्या मुलीच्या लग्नात वर्दीतील व्यक्ती पत्रावळ्या वाटत असल्याचे पाहून अनेकांना धक्का बसला. या लग्नामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, म्हणून पोलीस आणि होमगार्डची ड्युटी मोठ्या प्रमाणात लावण्यात आली होती. मात्र ड्युटी सोडून होमगार्डचा एक जवान लग्नाच्या पंगतीत पत्रावळ्या वाटत होता, असे व्हिडीओत दिसत होते. कोणीतरी हा व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला.
एसपींकडून तात्काळ कारवाई
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी संबंधित होमगार्डवर कारवाई केली. त्याची तात्काळ बदली करण्यात आली असून त्याला नोटीसही पाठवण्यात आली आहे. ड्युटीवर असताना लग्नात पत्रावळ्या वाटल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे. हा विवाहसोहळा लदमा गावात पार पडला.
प्रतिक्रिया व्यक्त करा