केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. ३० नोव्हेंबरपासून ते ३ डिसेंबरपर्यंत लोकसभेचं कामकाज चालणार आहे, तर २ आणि ३ डिसेंबरला राज्यसभेचं अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक मांडलं जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. या विधेयकासाठी आवश्यक असलेल्या आकड्यांची जुळवाजुळव केंद्र सरकारकडून जवळपास पूर्ण झाली आहे. केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरण रिजजू यांनी अधिवेशन बोलावल्याची माहिती दिली आहे. आवश्यक सरकारी कामासाठी अधिवेशन पुन्हा बोलावण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही आज आपल्या संसदीय समितीची बैठक बोलावली आहे. ही बैठक आज दुपारी साडेचार वाजता होणार आहे.
## डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंब्याची शक्यता
डिलिमिटेशन विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच या गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी तसे संकेत दिले होते. त्याचबरोबर डीएमकेही या विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. प्रत्येक राज्यात पन्नास टक्के जागा वाढवल्या तरच डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याचा विचार करू, असं डीएमकेचे नेते स्टॅलिन यांनी म्हटलं आहे. सध्या डीएमकेकडे २२ खासदार आहेत. त्यामुळे याच अधिवेशनात केंद्र सरकारकडून हे विधेयक पारित करण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. दोन्ही सभागृहांचं कामकाज ३ डिसेंबरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.
## पश्चिम बंगालमधील घडामोडींचा परिणाम
दरम्यान, पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचं दिसून आलं. वीस खासदारांनी बंडखोरी करत आपला वेगळा गट स्थापन केला आणि त्यानंतर त्यांनी नव्या पक्षात प्रवेश केला. आता हा खासदारांचा गटही केंद्रातील सरकारच्या या डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे याच विशेष अधिवेशनात हे विधेयक मांडलं जाऊ शकतं, असं मानलं जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा