नवी दिल्ली : केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० नोव्हेंबरपासून लोकसभेचे आणि २ डिसेंबरपासून राज्यसभेचे कामकाज बोलावण्याची विनंती दोन्ही सभागृहांच्या पीठासीन अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी, २७ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आठवड्यात होणारी ही दुसरी मंत्रिमंडळ बैठक ठरणार आहे.
अधिवेशनाचे वेळापत्रक काय?
संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून अधिवेशनाच्या वेळापत्रकाची माहिती दिली आहे. त्यानुसार आवश्यक शासकीय कामकाज पूर्ण करण्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी सोमवारपासून लोकसभेचे आणि २ डिसेंबर २०२६ रोजी बुधवारपासून राज्यसभेचे कामकाज पुन्हा सुरू करण्याची विनंती लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींना करण्यात आली आहे. कामकाजाच्या गरजांनुसार ३ डिसेंबर रोजी दोन्ही सभागृहांची कार्यवाही समाप्त होऊ शकते, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
आगामी सत्रात सरकारकडून काही महत्त्वाचे विधायी आणि शासकीय कामकाज पूर्ण केले जाण्याची शक्यता आहे. मात्र, या सत्रात नेमकी कोणती विधेयके किंवा प्रस्ताव मांडले जातील, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टता आलेली नाही. ऑगस्टपासून तहकूब असलेल्या पावसाळी अधिवेशनाचाच हा विस्तारित टप्पा मानला जात आहे.
पुनर्रचनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतभेद
लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची संख्या वाढवणे तसेच त्यांच्या सीमा पुन्हा निश्चित करणे, ही २०२३ च्या कायद्यानुसार महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू करण्यासाठी आवश्यक अट मानली जात आहे. किरेन रिजिजू यांनी नेमक्या कामकाजाचा तपशील जाहीर केलेला नसला, तरी शुक्रवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीच्या अजेंड्यावर मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचा विषय असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
संविधान दिनानिमित्त झालेल्या भाषणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत देशातील महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ठाम संकल्प असल्याचे सांगितले. कोणीही या प्रक्रियेला रोखू शकत नाही, असेही त्यांनी ठणकावले. दुसरीकडे, काँग्रेससह विरोधी पक्षांनी महिला आरक्षणाचा कायदा २०२३ मध्येच मंजूर झाल्यामुळे मतदारसंघ पुनर्रचनेची वाट न पाहता विद्यमान रचनेतच तो लागू करण्याची भूमिका घेतली आहे. राजकीय फायद्यासाठी मतदारसंघांच्या रचनेत फेरबदल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे शुक्रवारच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा