सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदानाचा ज्वर शिगेला पोहोचला असतानाच मतदान केंद्रावर अस्सल सोलापुरी राजकारणाचा दिलखुलास अंदाज पाहायला मिळाला. निवडणुकीच्या आखाड्यात एकमेकांविरोधात दंड थोपटणारे दिग्गज नेते प्रत्यक्ष भेटीत मात्र राजकीय मतभेद विसरून गप्पांच्या मैफलीत रंगले. आमदार सुभाष देशमुख यांनी शिवसेनेचे उमेदवार तथा नगरसेवक अमोल शिंदे यांच्या खांद्यावर हात टाकत साधलेला जिव्हाळ्याचा संवाद आणि आमदार विजयकुमार देशमुख यांची ‘दोन्ही पार्ट्या आमच्याच’ ही मिश्किल टिप्पणी संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली.
प्रतिष्ठेची लढत
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणीत सहकार विकास पॅनेलने यापूर्वीच दहा जागा बिनविरोध जिंकल्या असून उर्वरित नऊ जागांसाठी गुरुवारी मतदान पार पडले. यामध्ये नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघातील भाजपचे मनीष देशमुख आणि शिवसेनेचे अमोल शिंदे यांच्यातील प्रतिष्ठेच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र दोन्ही उमेदवार फडकुले सभागृहातील मतदान केंद्रावर एकमेकांच्या हातात हात देऊन दिलखुलास गप्पा मारल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मतदान केंद्रावरील वातावरण
निर्मलकुमार फडकुले सभागृहात मतदानाची प्रक्रिया सुरू असताना अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार दिलीप माने यांच्यासह प्रतिस्पर्धी उमेदवार मनीष देशमुख आणि अमोल शिंदे यांनी येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी अमोल शिंदे यांना जवळ घेत त्यांच्या खांद्यावर हात टाकून संवाद साधला. मतदान केंद्रावरील या दिलखुलास वातावरणाने सोलापूरच्या राजकारणातील वेगळीच झलक दाखवली.
प्रतिक्रिया व्यक्त करा