भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात १ ते २५ डिसेंबर या कालावधीत सेवा दूत अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या पूर्वतयारीसाठी पनवेल येथे ठाणे-कोकण विभागीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहिले आणि त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे, त्यांच्या अडीअडचणी आणि समस्या जाणून घेणे, त्यांना आवश्यक ते सहकार्य करणे आणि केंद्र तसेच राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
तळागाळापर्यंत योजना पोहोचवण्यावर भर
नागरिकांच्या दैनंदिन समस्या सोडवण्याबरोबरच शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे, हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करून प्रत्येक भागात पोहोचण्याचे धोरण या कार्यशाळेत निश्चित करण्यात आले. अभियानाची कार्यपद्धती, सूक्ष्म नियोजन आणि त्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत कार्यशाळेत सविस्तर चर्चा झाली.
कार्यशाळेला मान्यवरांची उपस्थिती
या विभागीय कार्यशाळेला प्रदेश सरचिटणीस आमदार माधवी नाईक, खासदार डॉ. हेमंत सवरा, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार प्रमोद जठार आणि आमदार विक्रांत पाटील उपस्थित होते. याशिवाय उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह ठाणे आणि कोकण विभागातील प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिक्रिया व्यक्त करा