कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मनोज जरांगे यांना ५०० कोटी रुपये दिल्याचा उल्लेख असलेल्या कथित क्लिपचा तपास एसआयटीकडून सुरू आहे. या प्रकरणात जरांगे यांची चौकशी झाल्यानंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
एसआयटीची चौकशी आणि पेन ड्राईव्ह
बुधवारी एसआयटीचे पथक जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे यांच्या घरी दाखल झाले. पथकाने जवळपास दोन तास त्यांची चौकशी केली. यावेळी जरांगे यांच्याकडून पेन ड्राईव्हही घेण्यात आला. या चौकशीनंतर जरांगे यांनी या प्रकरणात शिवसेना नेते रामदास कदम यांचीही चौकशी करण्याची मागणी केली.
एकनाथ शिंदे यांच्यावर ५०० कोटी रुपयांचे कथित आरोप करण्यात आले असून मुख्यमंत्र्यांनी त्याची चौकशी लावली आहे, असे कदम यांनी सांगितले. चौकशीत सर्व सत्य बाहेर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कदमांचा पलटवार आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष
जरांगे यांच्या मागणीनंतर कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. घाबरला आहात म्हणून माझ्याकडे बोट दाखवता, असा टोला त्यांनी जरांगे यांना लगावला. माझ्याकडे खूप मसाला आहे, मात्र सध्या मला काही बोलायचे नाही. चौकशीत जे काही आहे ते निष्पन्न होईल, असे सूचक विधानही त्यांनी केले.
जरांगे यांची पत्रकार परिषद होण्याआधीच बीडमध्ये ही ऑडिओ क्लिप वाजली होती आणि ती आपल्याकडे दुसऱ्या दिवशी आली, तेव्हा आपण त्यावर बोललो, असेही कदम यांनी स्पष्ट केले. आता कदम यांच्या या पलटवारावर जरांगे काय उत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा