राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष बदलल्या आहेत. विद्यमान अध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या जागी अंजली साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज मुंबईत पक्षाची महत्त्वाची बैठक झाली. त्यानंतर ही नियुक्ती जाहीर करण्यात आली. पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत साळवे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
साळवे यांची ओळख
अंजली साळवे-विठणकर या नागपूर येथील नामांकित वकील, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्त्या आणि राजकीय नेत्या आहेत. महिला व बालहक्क तसेच ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी त्या प्रामुख्याने काम करतात. त्यांनी चंद्रपूर येथील सरदार पटेल विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून त्यांनी कायद्यात पीएचडी संपादन केली आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी समुपदेशक म्हणून तसेच नागपूर येथील बाल कल्याण समितीच्या माजी सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. सध्या त्या कायदेशीर सल्लागार, समुपदेशक आणि विविध सरकारी व निमसरकारी संस्थांसाठी मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत.
पक्षाकडून व्यक्त करण्यात आलेला विश्वास
साळवे यापूर्वी पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत होत्या. आता त्यांच्याकडे महिला प्रदेश नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाने म्हटले आहे की, राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेत महाराष्ट्रातील महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी, त्यांना संघटित करण्यासाठी आणि पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाचा मोठा हातभार लागेल. या नियुक्तीबद्दल पक्षाकडून साळवे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा