मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात राज्य क्रीडा विकास समितीची बैठक उपमुख्यमंत्री तथा क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. राज्यभरातील विभागीय, जिल्हा आणि तालुका पातळीवरील क्रीडा संकुलांच्या प्रस्तावांचा या बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला. क्रीडा संकुलांची प्रलंबित कामे मार्गी लावणे, खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे आणि क्रीडा क्षेत्राच्या विकासाला नवी गती देणे, हे या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट होते.
अखर्चित निधी गरजू संकुलांकडे वळवणार
क्रीडा संकुलांसाठी मंजूर झालेला निधी अनेक ठिकाणी दीर्घकाळ खर्च न होता पडून असल्याचे बैठकीत समोर आले. असा अखर्चित निधी संबंधित समित्यांकडून परत घेऊन ज्या क्रीडा संकुलांना निधीची खरी गरज आहे, त्यांच्याकडे तो पुनर्वितरित करावा, असे स्पष्ट निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. हातात शिल्लक असलेला निधीही तातडीने खर्च करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. क्रीडा सुविधांच्या विकासात निधीची कमतरता भासू नये आणि उपलब्ध निधीचा प्रभावी तसेच योग्य वापर व्हावा, यावर त्यांनी भर दिला.
अनुदान मर्यादेबाहेरील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर
शासकीय अनुदानाच्या मर्यादेत बसणाऱ्या विविध तालुका, जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुलांच्या प्रस्तावांना बैठकीतच प्रशासकीय मान्यता देण्यात आली. मात्र अनुदान मर्यादेच्या बाहेर जाणाऱ्या क्रीडा संकुलांचे प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर सादर करावेत, असे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील खेळाडूंना उत्तम क्रीडा सुविधा मिळाव्यात, प्रलंबित कामे पूर्ण व्हावीत आणि क्रीडा क्षेत्राला नवी गती मिळावी, यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी बैठकीत सांगितले.
प्रतिक्रिया व्यक्त करा