१९९८ साली प्रदर्शित झालेल्या ‘सत्या’ चित्रपटातील भीकू म्हात्रे ही भूमिका अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या कारकिर्दीतील निर्णायक टप्पा ठरली. या भूमिकेतील त्यांच्या मराठी बोलण्याच्या शैलीने आणि व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांना इतके भारावून टाकले की, अनेकांना तो खरोखरच महाराष्ट्रातील असल्याचा समज झाला. खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतही हेच घडले. एका मुलाखतीत मनोज वाजपेयी यांनी या भेटीचा खास किस्सा सांगितला आहे.
बाळासाहेबांनी घरी बोलावले, आदराने स्वागत केले
राम गोपाल वर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सत्या’ चित्रपटाने मनोज वाजपेयी यांच्या कारकिर्दीला मोठी कलाटणी दिली. भीकू म्हात्रे या गुंडाच्या भूमिकेमुळे ते रातोरात लोकप्रिय झाले. केवळ प्रेक्षकच नव्हे, तर बाळासाहेब ठाकरे यांनाही मनोज वाजपेयी मराठी असल्याचे वाटले होते. त्यांनी मनोज यांना भेटण्यासाठी आपल्या घरी बोलावले होते. या भेटीत त्यांनी मनोज यांचे खूप आदराने स्वागत केले. मात्र, मनोज महाराष्ट्रातील नसल्याचे समजताच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मनोज यांनी सांगितले की, बाळासाहेबांनी त्यांना मराठी शिकण्यास सांगितले आणि ते थोडे निराशही झाले होते. मात्र, ही भेट खूप छान झाली आणि बाळासाहेबांनी त्यांना भविष्यासाठी भरपूर आशीर्वाद दिले.
२५ हजार रुपयांत तयार झाला भीकू म्हात्रेचा लूक
मनोज वाजपेयी यांनी यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत ‘सत्या’ चित्रपटाला आपल्या कारकिर्दीतील गेमचेंजर म्हटले होते. या चित्रपटाने केवळ त्यांचे आयुष्यच बदलले नाही, तर हिंदी चित्रपटसृष्टीतील कथा सांगण्याची पद्धत, अभिनय आणि चित्रपट निर्मितीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला, असे त्यांनी सांगितले होते. चित्रपटाच्या यशानंतर त्यांना मोठ्या चित्रपटांमध्ये काम करण्याच्या संधी मिळाल्या आणि इंडस्ट्रीत आदर व ओळखही मिळाली. या चित्रपटाशी संबंधित आणखी एक रंजक आठवण मनोज यांनी सांगितली. भीकू म्हात्रेच्या व्यक्तिरेखेचा लूक तयार करण्यासाठी त्यांना २५ हजार रुपयांचे बजेट देण्यात आले होते. त्यांनी स्वतः हिल रोड परिसरात जाऊन शर्ट, जीन्स आणि बनियन यांची खरेदी केली होती. भीकू म्हात्रे नेमके कसे कपडे घालेल, याची त्यांना स्पष्ट कल्पना होती, त्यामुळे व्यक्तिरेखेचा प्रत्येक पोशाख त्यांनी स्वतः निवडला होता.
प्रतिक्रिया व्यक्त करा