राज्यातील शिक्षकांनी अध्यापनाव्यतिरिक्त येणाऱ्या प्रशासकीय कामांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शिकवण्याशिवाय इतर कामांचा भार वाढल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होत असल्याचे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर १ डिसेंबरपासून अध्यापनाव्यतिरिक्तच्या सर्व ऑनलाइन कामांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे.
शिक्षकांवर कोणता भार?
शिक्षकांना शिकवण्याबरोबरच निवडणुकांची कामे, जनगणना आणि वेळोवेळी येणारी प्रशासकीय कामे करावी लागत आहेत. ऑनलाइन माहिती गोळा करणे आणि विविध उपक्रमांची जबाबदारीही शिक्षकांवर टाकली जात असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे. अहोरात्र येणाऱ्या संदेशांमुळे मानसिक त्रास होत असल्याची तक्रारही शिक्षकांनी केली आहे. अशैक्षणिक कामांमुळे शिकवण्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सरकारचे धोरण आणि पुढील पाऊल
शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत, असे सरकारचे धोरण असतानाही अनेक जिल्ह्यांत विविध कामे शिक्षकांनाच सोपवली जात असल्याचे समोर आले आहे. शाळांमधील स्वयंसेवी संस्थांचा वाढता हस्तक्षेपही शिक्षकांसाठी अडचणीचा ठरत असल्याचे सांगण्यात येत आहे. ऑनलाइन कामांवरील बहिष्काराच्या निर्णयामुळे प्रशासकीय यंत्रणेसमोर पेच निर्माण होऊ शकतो. त्यामुळे बहिष्कारानंतर तरी शिक्षकांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा