अमरावतीच्या जिल्हा रुग्णालय परिसरातून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या पोस्टमार्टम कक्षाबाहेरील नाल्यात मानवी अवयव आढळून आल्याने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. भटके कुत्रे या मृतदेहाचे लचके तोडत असताना दिसल्याने खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार हे अवयव सात ते आठ तुकड्यांच्या स्वरूपात असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे रुग्णालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
चार-पाच दिवसांपूर्वी नाल्यात पडून मृत्यूची शक्यता
चार ते पाच दिवसांपूर्वी एका भिकाऱ्याचा नाल्यात पडून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेशी संबंधित मृतदेहाचे अवयव असल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. आज सकाळी भटके कुत्रे मृतदेहाचे लचके तोडत असताना आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांकडून तपास सुरू; सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नाल्यातून मानवी अवयव बाहेर काढून ताब्यात घेतले असून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सध्या सुरू आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासह या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. मात्र या प्रकरणात पुढील तपासानंतर अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा