केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डिलिमिटेशन विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. आता ३० तारखेला हे विधेयक संसदेत सादर केले जाण्याची शक्यता आहे. हे विधेयक मंजूर करण्यासाठी एनडीएला ३६० खासदारांचा पाठिंबा गरजेचा आहे. पावसाळी अधिवेशनात महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेत सादर केले होते, पण केंद्र सरकारकडे दोन-तृतीयांश बहुमत नसल्यामुळे ते मंजूर झाले नव्हते. आता सरकारने हे विधेयक पुन्हा सादर करण्यासाठी पावले उचलली आहेत.
चार पक्षांचा सूर बदलल्याची चर्चा
भाजपप्रणित एनडीएला विरोधकांमधील चार पक्षांना मनवण्यात यश आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विरोधी पक्षातील चार महत्त्वाच्या पक्षांनी अचानक सूर बदलल्याचे बोलले जात आहे. एनडीएने विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक दोन-तृतीयांश खासदारांचा पाठिंबा मिळवला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र कोणत्याही पक्षाने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.
कोणते पक्ष चर्चेत?
या विधेयकांवर इंडिया आघाडीतील काही पक्ष संसदेत वेगळी भूमिका घेऊ शकतात, अशी राजकीय चर्चा रंगली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सर्वाधिक चर्चेत आहे. आठ खासदार असलेला हा पक्ष एनडीएच्या वतीने मांडल्या जाणाऱ्या विधेयकाच्या बाजूने मतदान करू शकतो, असे बोलले जात आहे. आरजेडीही या विधेयकाला पाठिंबा देऊ शकतो, अशी चर्चा आहे. आरजेडीचे लोकसभेचे चार खासदार आहेत. त्याशिवाय डीएमके आणि वायएसआरसीपी यांच्याबद्दलही चर्चा सुरू आहे. डिलिमिटेशन विधेयक मंजूर झाले तर प्रत्येक राज्याच्या ५० टक्के जागा वाढणार असून लोकसभेच्या जागा ८५० पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा