केंद्र सरकारने दिल्लीत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात डिलिमिटेशन तसेच महिला आरक्षण विधेयक मांडले जाण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीकडून या विधेयकाला विरोध होत असतानाच राष्ट्रवादीने विधेयक हाती आल्यानंतरच निर्णय घेण्याची भूमिका मांडली आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनीही त्याच पद्धतीने या विधेयकाबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
प्रारूपच मिळालेले नाही
विधेयकाचे प्रारूप आपल्याला मिळालेले नाही आणि सत्ताधाऱ्यांनी याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही, असे सावंत म्हणाले. विधेयकात फक्त ५० जागा वाढवणार असल्याचे कुठेही म्हटलेले नव्हते; लोकसंख्येनुसार रचना केली जाईल, असे त्यात नमूद होते. त्यामुळे हा बदल फक्त ५० टक्के जागा वाढण्यापुरता मर्यादित नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयात सध्या आपली याचिका सुरू असून एका शब्दामुळे त्या प्रकरणात किती बदल होतो हे सर्वांनी पाहिले आहे, असेही सावंत म्हणाले. विधेयक आणले जाईल तेव्हा त्यातील प्रत्येक शब्द महत्त्वाचा ठरेल आणि त्या शब्दाचा मोठा अर्थ असेल, असे त्यांनी नमूद केले.
निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न
विधेयक वाचल्याशिवाय त्यावर कोणतीही भूमिका घेणार नाही, असे सावंत यांनी सांगितले. आरक्षणाचे विधेयक आधीच मंजूर झाले असून त्याची अंमलबजावणी आजच्या संख्येनुसारही करता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र त्यासोबत परिसीमन कसे केले जाईल आणि ते कोण ठरवणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता नसल्याचे सांगत, आपल्या पक्षाला फायद्याचा नसलेला भाग वगळण्याचा प्रयत्न या विधेयकातून होऊ शकतो, असा धोकाही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, उद्या विरोधी पक्षांची बैठक होणार असून उद्धव ठाकरे या संदर्भात मार्गदर्शन करतील, असे सावंत म्हणाले. मुद्द्यांवरून विरोध केला जाईल; विरोधासाठी विरोध केला जाणार नाही. आपण विरोध का करतो, हेही सांगितले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रतिक्रिया व्यक्त करा