पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनाचा टायर पंक्चर झाल्याने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या प्रवासी कुटुंबाला तीन ते चार अज्ञात चोरट्यांनी काठीचा धाक दाखवून लुटले. महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख २३ हजार रुपयांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. बुधवारी (२५ नोव्हेंबर) मध्यरात्री एकच्या सुमारास यावली (ता. मोहोळ) गावाजवळ ही घटना घडली.
टायर बदलताना चोरट्यांचा हल्ला
किशोर विठ्ठल फाळके (रा. पणदरे, ता. बारामती, जि. पुणे) हे कुटुंबीयांसह पुणे-सोलापूर महामार्गावरून प्रवास करत होते. यावली येथील हॉटेल सोलापूर इनच्या पूर्वेस सुमारे ५०० मीटर अंतरावर रात्री एकच्या सुमारास त्यांच्या चारचाकी वाहनाचा टायर पंक्चर झाला. त्यामुळे टायर बदलण्यासाठी त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला थांबवले.
त्याचवेळी तीन ते चार अज्ञात इसम तेथे आले. त्यांनी काठीचा धाक दाखवत फाळके आणि त्यांच्या कुटुंबीयांना हाताने मारहाण केली. त्यानंतर वाहनातील दोन महिलांच्या अंगावरील सुमारे एक लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच किशोर फाळके यांच्या खिशातील तीन हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख २३ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला.
अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा; तपास सुरू
लुटीनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी अज्ञात तीन ते चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. महामार्गावर घडलेल्या या लुटीच्या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. रात्रीच्या वेळी महामार्गावर थांबणाऱ्या प्रवाशांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा