अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या वडिलोपार्जित हाजी इस्माईल हाजी हबीब मुसाफिरखाना ही भेंडी बाजारातील इमारत पालिकेने अतिधोकादायक म्हणून घोषित केली आहे. पालिकेच्या सी विभागाने ही इमारत पाडण्यासाठी नोटीस बजावत १८ आणि १९ नोव्हेंबरला तोडकामाची कारवाई करण्याचे नियोजन केले होते. मात्र इमारतीमधील प्रार्थनास्थळावरून वाद निर्माण झाल्याने १८ तारखेची प्रस्तावित कारवाई पुढे ढकलण्यात आल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली आहे.
इमारत का पाडली जात आहे
पाकमोडिया स्ट्रीट परिसरातील जीर्ण अवस्थेतील ही इमारत पालिकेने सी-१ म्हणजेच अतिधोकादायक श्रेणीत वर्गीकृत केली आहे. इमारतीच्या सुरक्षेसाठी तसेच परिसरातील अंतर्गत रस्त्याच्या रुंदीकरणासाठी पालिकेने १६ नोव्हेंबरला इमारत पाडकामाची नोटीस बजावली. परंतु इमारतीच्या तळमजल्यावरील प्रार्थनास्थळावरून स्थानिकांनी कारवाईला विरोध केला.
न्यायालयीन पेच निर्माण
काँग्रेसचे आमदार अमीन पटेल यांनी इमारतीच्या तळमजल्यावर प्रार्थनास्थळ असून त्याबाबत न्यायालयीन वाद सुरू असल्याचा दावा केला आहे. उच्च न्यायालयाने यापूर्वी तोडकामाला स्थगिती दिली आहे. न्यायालयीन आदेश अस्तित्वात असताना घाईघाईने तोडकाम करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, पालिकेने ३१ ऑगस्ट २०२० रोजीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करणार असल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे. दोन्ही बाजूंकडून न्यायालयाचा आधार घेतला गेल्याने कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. परिसरातील संवेदनशील परिस्थिती आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन प्रशासनाने पालिका मुख्यालयात सकाळी महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर कारवाईसंदर्भात निर्णय होणार होता. मात्र ही बैठक काही कारणास्तव झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रतिक्रिया व्यक्त करा