दुष्काळ आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारसोबत शिवसेनाही मैदानात उतरली आहे. शेतकऱ्यांनी कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये, त्यांच्यामागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. महाड येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी फायनान्स कंपन्यांना थेट इशाराही दिला. कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या मागे वसुलीसाठी तगादा लावल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल आणि जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही, असे शिंदे म्हणाले.
## मराठवाड्यासाठी 50 ट्रक चारा
महाडमधील कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या अडचणींवर बोलताना शिंदे यांनी त्यांना दिलासा देण्याची भूमिका मांडली. महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा असल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी शिवसेनेने उचलल्याची माहितीही त्यांनी दिली. दुष्काळाचा फटका बसलेल्या मराठवाड्यातील जनावरांसाठी रायगड जिल्ह्यातून 50 ट्रक चारा पाठवला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
## दरडग्रस्तांचे पुनर्वसन लवकरच मार्गी लागणार
महाड आणि पोलादपूर तालुक्यातील दरडग्रस्त कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबतही शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली. तळीये आणि पारमाची येथील बाधित कुटुंबांना लवकरच घरे मिळतील, असे आश्वासन त्यांनी दिले. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर असल्याचे या कार्यक्रमातून स्पष्ट झाले.
प्रतिक्रिया व्यक्त करा