वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी आणि वायुप्रदूषणामुळे पुण्याच्या रस्त्यांवरील प्रवास दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे. या समस्यांवर उपाय म्हणून सार्वजनिक वाहतूक, सायकल आणि पायी चालण्याला प्राधान्य देण्याची गरज व्यक्त होत आहे. शहरात मेट्रो आणि पीएमपीएमएलच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय वाढले असले, तरी खासगी वाहनांवरील नागरिकांचे अवलंबित्व कायम आहे.
जागतिक शाश्वत वाहतूक दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. ‘पीपल नियर ट्रान्झिट’ २०२६ या अभ्यासानुसार, दोन्ही शहरांतील ९४ टक्के लोकसंख्येला चालत जाण्याच्या अंतरावर सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र, केवळ २१ टक्के लोकसंख्येला पाच मिनिटांच्या चालण्याच्या अंतरावर वारंवार बससेवा मिळते. २०१९ मध्ये हे प्रमाण ६६ टक्के होते, असे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
कोणत्या भागांत बससेवा वाढवण्याची गरज?
पुण्यातील बाणेर, धानोरी, धायरी, हडपसर, कोंढवा, कोथरूड, आंबेगाव आणि वडगाव शेरी या भागांत बससेवेची वारंवारता वाढविण्याची गरज अभ्यासातून अधोरेखित झाली आहे. सार्वजनिक वाहतूक जवळ उपलब्ध असूनही तिची नियमितता आणि जोडसेवेचा अभाव ही शाश्वत वाहतुकीसमोरील प्रमुख आव्हाने ठरत आहेत.
मेट्रोची जोडसेवा हाच खरा प्रश्न
दुसरीकडे, पुणे मेट्रोला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असला, तरी मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठीची जोडसेवा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बस, रिक्षा आणि सायकल यांची मेट्रोशी प्रभावी सांगड घातल्यास खासगी वाहनांचा वापर कमी होऊ शकतो. पॅरिसर संस्थेच्या नोव्हेंबर २०२६ मधील अभ्यासात सायकल भाड्याने वापरण्यास ५५ टक्के, तर सामायिक रिक्षांचा वापर करण्यास ७५ टक्के प्रवाशांनी तयारी दर्शविली आहे. त्यामुळे बससेवेची वारंवारता, बसची उपलब्धता आणि मेट्रोशी जोडमार्ग यांमध्ये सुधारणा करणे, तसेच सुरक्षित पादचारी मार्ग, सलग सायकल मार्ग आणि सामायिक रिक्षांसाठी निश्चित थांबे विकसित करणे गरजेचे असल्याचे अभ्यासात म्हटले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा