उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. समाजवादी पक्षाकडून काँग्रेसला 26 जागांची ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती आहे. उत्तर प्रदेश विधानसभेत 403 जागा आहेत. जागावाटपावरून समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमध्ये दुसऱ्या फेरीची चर्चा सुरू आहे.
26 जागांची ऑफर कशी?
समाजवादी पक्षाचे सरचिटणीस राम गोपाळ यादव यांनी मंगळवारी, 24 नोव्हेंबर 2026 रोजी सांगितले की, दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाच्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीपूर्वी पक्षाने 2027 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसला 26 जागांची ऑफर दिली आहे. दिल्लीतील काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांच्या निवासस्थानी चर्चेपूर्वी पत्रकारांशी बोलताना यादव यांनी काँग्रेसला 26 जागांची ऑफर दिल्याची पुष्टी केली.
यादव म्हणाले की, आम्ही काँग्रेसने जिंकलेल्या दोन जागा, जिथे काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिली अशा चार जागा आणि इतर 20 जागांची ऑफर दिली आहे. या 20 जागांवर समाजवादी पक्षाला 60,000 ते 70,000 मते मिळाली होती, तर काँग्रेसला केवळ सुमारे 2,000 मते मिळाली होती.
2022 मध्ये काँग्रेस जिंकलेल्या जागांचा समावेश या ऑफरमध्ये आहे. दुसऱ्या क्रमांकावरील जागाही काँग्रेसच्या वाट्याला येणार आहेत. याशिवाय आणखी 20 जागा देण्याची तयारी समाजवादी पक्षाने दर्शवली आहे. 26 जागांव्यतिरिक्त मागितलेल्या जागांचे गणित विचारले आहे. काँग्रेसकडून मागणी केलेल्या इतर जागांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. 130 जागांवरील विजयाचे गणित विचारले असल्याची माहिती आहे. संभाव्य उमेदवारांची माहितीही समाजवादी पक्षाने मागितली आहे.
काँग्रेसची 67 जागांवर ठाम भूमिका
दुसरीकडे काँग्रेसची 67 जागांवर तडजोड न करण्याची भूमिका आहे. जागावाटपासाठी काँग्रेसकडून तीन श्रेणींचे वर्गीकरण करण्यात आले आहे. 46 जागा ‘ए’ श्रेणीत समाविष्ट केल्या आहेत, 21 जागा ‘बी’ श्रेणीत समाविष्ट आहेत. या 67 जागांवर काँग्रेस तडजोड करणार नाही, अशी माहिती आहे. उर्वरित जवळपास 65 जागा स्वतंत्र श्रेणीत आहेत. या जागांवर वाटाघाटी करण्याची काँग्रेसची तयारी आहे.
समाजवादी पक्ष आणि काँग्रेसमधील जागावाटपाच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना उत्तर प्रदेशचे मंत्री दयाशंकर सिंह यांनी बलिया येथे सांगितले की, हे दोन्ही पक्ष परस्परविरोधी टोकाचे आहेत आणि केवळ स्वतःच्या फायद्यासाठी एकत्र येत आहेत. त्यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर राजकीय स्वार्थापोटी काँग्रेसशी युती केल्याचा आरोप केला. या दोन्ही पक्षांमध्ये ना वैचारिक साम्य आहे, ना देश आणि समाजासाठी कोणताही समान उद्देश आहे, असे सिंह म्हणाले. यादव यांनी त्यांचे वडील आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या विचारांशी विश्वासघात केल्याचा आरोपही मंत्र्यांनी केला. मुलायम सिंह यादव यांनी काँग्रेसच्या विरोधात पक्षाची स्थापना केली होती, असे सिंह म्हणाले.
Leave a Reply