जिल्हा नियोजन समितीचा (डीपीसी) निधी जिल्हा परिषदेच्या सदस्यांना मिळाला पाहिजे. त्यात आमदार आणि मंत्र्यांनी वाटा मागण्याचे कारण नाही. मात्र राज्य सरकारकडून निधीचे वाटप करताना दुजाभाव केला जातो, अशी तक्रार आमदार सतेज पाटील यांनी केली. सगळं आमच्याच ओंजळीने झालं पाहिजे, असं सत्तेतील लोकांना वाटतं, अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली. मंगळवारी कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पाटील म्हणाले की, जिल्हा परिषद सदस्य त्यांचा निधी विधानसभा क्षेत्रातच खर्च करणार आहेत, तो जिल्ह्याबाहेर जाणार नाही. पालकमंत्री सांगतात की, डीपीसीच्या निधीचे ७०:३० असे वाटप होते. या प्रस्तावाला जिल्हा परिषदेतील आमच्या १७ सदस्यांनी विरोध केला आहे. सत्ताधारी गटातील ३० लोकांनीही विरोधाच्या प्रस्तावावर सह्या केल्या आहेत, असे पाटील यांनी सांगितले.
सरकारला निधीचे वाटप अशाच प्रकारे करायचे असेल तर डीपीसी ठेवताच कशाला, डीपीसीच्या बैठका बंद करा. सगळे निर्णय राज्यातूनच घ्या. राज्यात बसून समन्वय करायचा असेल तर राज्यातील सगळ्या जिल्हा नियोजन समित्या रद्द करा, कुठलीच ठेवू नका, असे पाटील म्हणाले. जिल्ह्यात बसून त्या निधीचे नियोजन करता यावे यासाठी डीपीसी अस्तित्वात आली. यात जिल्हा परिषद सदस्यांचा वाटा जास्त असतो. पण राज्य सरकारने डीपीसीचे पैसे कसे खर्च होणार हे आम्ही ठरवू म्हटले तर या सगळ्याला काही अर्थ राहणार नाही, असे त्यांनी म्हटले.
राज्याचं बजेट तुम्ही ठरवता, तुम्ही योजनेतर पैसे देता, तुम्ही डीपीसीच्या पैशांवर आमदार-खासदारांनी हक्क का सांगावा, हा माझा प्रश्न आहे. मग एक तर डीपीसी रद्द करा, जिल्हा परिषद रद्द करा, तुम्हीच सगळं करा, तुम्ही सगळं निधीवाटप करून विकास करा, असे पाटील म्हणाले.
गोकुळच्या निवडणुकीवरूनही आरोप
गोकुळच्या निवडणुकीनंतर कोल्हापुरात चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांनी काही बॅनर लावले होते. सतेज पाटलांना दादा कळाले नाहीत, अशा आशयाचा मजकूर त्यावर होता. याबद्दल विचारले असता पाटील म्हणाले की, चंद्रकांतदादा मला चांगलेच कळाले आहेत, कोल्हापूरकरांना कळाले आहेत आणि महाराष्ट्रालाही कळाले आहेत.
गोकुळच्या निवडणुकीत बहुमत मिळाले की त्याचा अध्यक्ष होईल, अशी सरळ प्रक्रिया होती. इथे कोरमचा विषयच नव्हता. पण डेडलॉक हा दिशाभूल करणारा शब्द प्रचारात आणण्यात आला, असे पाटील म्हणाले. महायुतीची १२ लोक आली असती तर कोरम पूर्ण झाला असता. पण त्या १२ लोकांसोबत चार बॉडीगार्ड पाठवून बहुमत मिळवले गेले, असा आरोप त्यांनी केला. गोकुळवर प्रशासक आणावा लागला असता हा दिशाभूल करणारा प्रचार असल्याचे त्यांनी म्हटले. हा कायदा मंजूर होऊ नये म्हणून सत्ताधारी पक्षातील अनेकांचे फोन आले होते, असेही पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील आणि हसन मुश्रीफ या दोघांमुळेच गोकुळवर सरकारी संचालक आणण्यात आले, असे पाटील यांनी म्हटले.
Leave a Reply