सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपप्रणित पॅनलवर गंभीर आरोप केला आहे. मतदारांनी मतदान कुणाला केले हे कळेल, अशी दमबाजी सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
खासदार मोहिते पाटील यांनी भाजपसमोर स्वतःचे पॅनल तयार करून आव्हान दिले आहे. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी सावध झाले आहेत. जिल्हा बँकेच्या मतदारांना तुमचे तालुकाप्रमाणे मतदान कोणाला केले हे समोर येणार आहे, अशी भीती दाखवली जात असल्याचे मोहिते पाटील यांनी सांगितले. सहकार निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात मोठे काम केलेल्या नेत्यांना बाहेरून येऊन कोणी दमबाजी करत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
## १९ पैकी १० जागा बिनविरोध
संचालक मंडळाच्या १९ जागांपैकी भाजप पुरस्कृत सहकार विकास पॅनलचे १० उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे बँकेवर या पॅनलची सत्ता निश्चित झाली आहे. उर्वरित ९ जागांवर भाजपच्या वतीने उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, विधान परिषद आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार राजन पाटील यांचे दोन्ही पुत्र विक्रांत आणि अजिंक्यराणा पाटील यांचा समावेश आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक, शंभूराजे जगताप, यशवंत शिंदे, सिद्धेश्वर अवताडे, पृथ्वीराज माने आणि श्रीदीप हसापुरे यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघाचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख हे सुद्धा भाजप पुरस्कृत पॅनलमध्ये सहभागी झाले आहेत.
## २६ नोव्हेंबरला मतदान, २७ ला मतमोजणी
उर्वरित ९ जागांसाठी २६ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २७ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.
बँकेची निवडणूक असल्यामुळे आम्ही फक्त बँकेवरच बोलतो, असे सांगत मोहिते पाटलांवर आरोप केले जातात की तुम्ही संस्था बुडविल्या. यावर उत्तर देताना रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले की, आम्ही कोणत्या संस्था बुडविल्या ते तरी सांगावे. मी पाच वर्षे अध्यक्ष असताना एक रुपयाचेही कर्ज मोहिते पाटील यांच्या संस्थेला कधी दिले नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. यावर भाजपकडूनही जोरदार उत्तर देण्यास सुरुवात झाली असून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. मोहिते पाटलांनी बुडवलेल्या संस्थांची यादी जिल्ह्यातील नेते जाहीर करतील, असे गोरे म्हणाले. सोलापुरातील भाजपचे उमेदवार आणि सहकारी मोहिते पाटलांना पुरून उरतील एवढी ताकद त्यांच्यात आहे, त्यामुळे आपली ताकद वापरायची गरज नसल्याचा टोलाही गोरे यांनी लगावला.
Leave a Reply